

वाल्हे: जानेवारी महिन्यात पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार आहे. यानिमित्त ग्रामीण भागातील गावोगावी अनेक ठिकाणच्या भिंती रंगवल्या आहेत. त्यामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडल्याचे दिसून येते.
या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील रस्तेविकास आणि पर्यटनालाही नवे बळ मिळणार आहे. स्पर्धेच्या तयारीत ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे तयार होत आहे. स्पर्धेच्या मार्गावर येणाऱ्या ग्रामीण भागातील डोंगर खोऱ्यातील अनेक रस्ते वर्षानुवर्षे दुर्लक्षित होते. आता मात्र या स्पर्धेमुळे त्या रस्त्यांचे काम सुरू आहे. तसेच अनेक ठिकांणी मार्गाच्या बाजुच्या भिंतीवर आकर्षक चित्रे रेखाटण्यात येत आहेत.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या नियोजनानुसार सायकलस्वारांसाठी सुरक्षित, प्रशस्त आणि गुळगुळीत रस्ते करण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित खड्डेमय रस्ते, अरुंद व वळणदार रस्त्यांची दुरुस्ती होत आहे. यातून अनेक गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होत आहे. याचा थेट फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि कामगारांना होणार आहे.
या स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या भित्तिचित्रांनी संपूर्ण परिसराचे रूपडे पालटले आहे. सायकल स्पर्धेचे दृश्य, क्रीडा भावना, पर्यावरणपूरक संदेश तसेच ग््राामीण संस्कृती दर्शविणारी चित्रे भिंतींवर रंगविण्यात आली आहेत. या चित्रलेखांमुळे मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांसह प्रवाशांना वेगळ्याच अनुभवाची अनुभूती मिळत आहे.
या उपक्रमात स्थानिक कलाकार व युवकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. आपल्या गावातून आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार असल्याने नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. भविष्यात या मार्गावरून पर्यटन वाढण्याची शक्यता असून, स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.