

पुणे : पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकल स्पर्धेबाबत देश-विदेशात मोठी उत्सुकता असून, या स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावणार आहे. त्यामुळे स्पर्धेशी संबंधित सर्व कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. सायकलपटूंना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे ग्रँड चॅलेज टूर स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, साबांविचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव, पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील, पुणे ग्रामीणचे उपअधीक्षक दिलीप शिंदे, पुणे ग्रँड चॅलेज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डुडी यांनी सांगितले की, स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांची कामे उच्च दर्जाची असावीत. दिशादर्शक फलक, मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या पट्टींची रंगरंगोटी गतीने पूर्ण करावी. स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता रस्त्यांचे सौंदर्यीकरण करावे. मार्गालगत अतिक्रमण आढळल्यास पोलिस विभागाच्या मदतीने तातडीने हटवण्यात यावे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाने संयुक्तपणे रस्त्यांची तपासणी करून वाहतूक नियोजन व गर्दी व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करावे. ग्रामीण भागात पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः सायकलवरून मार्गाची पाहणी करून सुरक्षिततेचा आढावा घ्यावा. स्पर्धेसाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहने व बॅरिकेडिंगची व्यवस्था करावी. नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करून रंगीत तालमी घेण्यात याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत विविध विभागांकडून सुरू असलेल्या व प्रस्तावित कामकाजाबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
स्पर्धेचे ब्रँडिंग मोठ्या प्रमाणात करण्यात यावे. यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, बसस्थानके, मेट्रो स्थानके, पुणे महानगर परिवहन महामंडळ आदी ठिकाणी जाहिरात फलक उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
फोटो - 18 कलर १