

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील महायुतीची पहिली महत्त्वाची बैठक गुरुवारी पुण्यात पार पडली. मात्र, या बैठकीतून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा ४० वर्षांचा गड हादरवणारे शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. त्यांना या बैठकीचे निमंत्रणच दिले नव्हते. त्यामुळे भाजप नेत्यांवर त्यांनी केलेली टीका व आरोप त्यांना भोवले असून, त्यामुळेच त्यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर आता दोन्ही पक्षांतील जागावाटप आणि निवडणूकपूर्व तयारीला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, खासदार मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष गणेश बिडकर, तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, माजी आमदार बापू शिवतरे, नाना भानगिरे आदी नेते उपस्थित होते. मात्र, महायुतीतीलच एक प्रमुख चेहरा असलेल्या धंगेकरांना निमंत्रणच न मिळाल्याने धंगेकर मुद्दाम डावलले का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत आमदार बनलेल्या रवींद्र धंगेकरांनी नंतर लोकसभेत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्या पराभवानंतर 'सत्तेत नसल्यास कामे होत नाहीत' असे सांगत त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, शिवसेनेत आल्यानंतरही त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर सातत्याने टीका सुरूच ठेवली. जैन होस्टेलप्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर बरीच टीका करत कारवाईची मागणी केली होती. याबरोबरच भाजपमधील अनेक नेत्यांच्या विरोधात धंगेकर हे सातत्याने बोलत होते. त्यामुळे जर महायुती करायची असेल तर रवींद्र धंगेकर यांना दूर ठेवावे लागेल हे शिवसेनेच्याच पक्षप्रमुखांची भूमिका असल्याची चर्चा आहे. या बैठकीबाबत भाजपकडून नाराजी नसल्याचे स्पष्ट करत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी थेट शिवसेनेच धंगेकरांना बैठकीचे निमंत्रण दिले नाही, असे सांगितले.
या घटनेमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद आता पुन्हा समोर आला. एकीकडे रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी आणि मुलगा दोघेही महापालिका निवडणुकीसाठी तयारीत आहेत. भाजपचे गणेश बिडकर यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याची रणनीती असल्याने, महायुती झाली तर हे गणित बिघडेल, अशी धंगेकरांची भीती असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच १६५ जागांवर ठाम राहण्याची त्यांची भूमिका आणि महायुतीबाबतचा संकोच वारंवार समोर येत आहे. याउलट शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे हे भाजपसोबत युतीसाठी आग्रही दिसत असून, ३५ ते ४० जागांचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होणार आहेत. दुपारनंतर पुण्यात शिवसेना आणि भाजपा नेत्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीचे मला निमंत्रण आले नाही. बैठकीचा निरोप आला तर मी जाईन, तसेच भाजपची माझ्यावर नाराजी वाढते की कमी होते ते मला पाहावे लागेल, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली. महायुतीमध्ये शिवसेनेला किती जागा मिळाव्यात, या प्रश्नावर ते म्हणाले, आज दोन्ही पक्षांतील नेत्यांची जागावाटपाबाबत पहिली बैठक होत आहे. ही अंतिम बैठक नसून चर्चा होईल. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे जागांबाबत म्हणणे मांडणार आहे.
रवींद्र धंगेकर, माजी आमदार व शिवसेना महानगरप्रमुख.