

पुणे : धनंजय मुंडे हे अगोदरच वादग्रस्त आहेत. त्यांच्यावर कृषिमंत्री म्हणून झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्पष्टता, खुलासे झालेले नाहीत. त्यामुळे वादग्रस्त असलेल्या मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. तसेच मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवार यांना जबाबदार धरलेच पाहिजे, असे माझे स्पष्ट मत असल्याचेही ते म्हणाले.
साखर संकुल येथील बैठकीनंतर गुरुवारी (दि.18) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. पार्थ पवार यांच्यावरील कारवाईबद्दल अधिवेशनात काहीच झाले नसल्याबद्दल छेडले असता, शेट्टी म्हणाले, केवळ दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून चालणार नाही, अशी वारंवार मागणी आम्ही केली आहे. पार्थ पवार यांचे त्या कंपनीत 90 टक्के शेअर्स असतील तर ते मोकाट का सुटतात? त्यांना का जबाबदार धरले जात नाही. मुळात पार्थ पवार ही व्यक्ती महत्त्वाची नसून, त्यांचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार हे महत्त्वाचे आहेत. म्हणून सरकारचा महसूल बुडविण्यापासून ते सरकारी जागा हडप करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. म्हणून पार्थ पवार यांना जबाबदार धरलेच पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काढून टाकलं पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. ते म्हणाले, जो नियम सुनील केदार यांना लावला, लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांना नियम लावला होता. मग माणिकराव कोकाटे हे वेगळ्या जगातून आले आहेत काय? केवळ न्यायालयाच्या आदेशाची प्रत आली नाही म्हणून कारवाई थांबविता कामा नये. नाही तर नार्वेकर यांनी एक चांगला ज्योतिषी बघून मुहूर्त काढून कोकाटे यांना समारंभपूर्वक विधानसभेतून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली.
सातारा येथील ड्रग्ज प्रकरणात संबंधितांच्या रिसॉर्टवरील सापडलेली बाब मला माहिती नाही, असे ते म्हणू शकत नाहीत. सरकारमधील उच्चपदस्थ व्यक्ती असल्याशिवाय हे होत नाही. वय वर्षे 17 ते 22 वयाची मुले व्यसनाधिन व हिंसक झाली आहेत. शिरोळमध्ये चार लहान मुलांचे ड्रग्जमधून खून झाले आहेत. सरकारमधील उच्चपदस्थांचा अशा गोष्टींना आश्रय असेल, तर ही बाब गंभीर असून महाराष्ट्र नासायला लागल्याचे ते म्हणाले.
देशात 19 डिसेंबरला देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होणार असे वक्तव्य हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, चव्हाण हे जबाबदार व राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. ते बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध नव्हते. त्यांच्या वक्तव्यामध्ये काही तरी निश्चितच असणार. एक दिवसाचा प्रश्न आहे. राजकारण सोडा, पण मराठी माणूस पंतप्रधान झाला तर मलासुद्धा आनंद होईल.
भाजपमध्ये प्रज्ञा सातव यांचा झालेला प्रवेशावर ते म्हणाले, प्रलोभने, भीती दाखविणे हे चालूच आहे. कदाचित प्रज्ञा सातव यांच्यावर अन्याय झाला असेल. काँग्रेसने त्यांच्या सासुबाईवर फार मोठा अन्याय केला असवा. अनेक वर्षे त्यांना इच्छा नसताना मंत्रिपद दिले. राजीव सातव यांना आमदार, खासदार केले. प्रज्ञा सातव यांनाही आमदार केले. हा अन्याय सहन न झाल्याने त्या भाजपमध्ये जात असाव्यात, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.
मी 2018 साली बांधकाम कामगार मंडळामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर आवाज उठविला होता. खरेदीमध्ये 11 हजार कोटींचा घोटाळे झाल्याचे मी बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. आता माझ्या या आरोपांवर कॅगच्या अहवालात ताशेरे मारलेले आहेत. तरी राज्यात बोगस कामगार दाखवून मध्यान्ह भोजनात पैसा उडविण्यात आला आहे. हा पैसा सामान्यांचा आहे. टाऊन प्लॅनिंगकडे एनए करण्यासाठी जमीन टाकली तरी वर्गणी भरावी लागते. बांधकाम कामगारांच्या नावाखाली पैसा घेऊन उधळपट्टी झालेली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पुराव्यानिशी त्यावेळीही पुरावे दिले होते. आजही त्यावर ते बोलत नाहीत, हे दुदैव असल्याचे शेट्टी म्हणाले.