

पुणे : पुस्तक घेणे, वाचणे आणि अभ्यास करणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक पुस्तक पूर्णच वाचले पाहिजे असे नाही. तर काही पुस्तके सखोल वाचावी लागतात, अलीकडील काळात केवळ पुस्तके न वाचता पॉडकास्ट, अॉडिओ बुक्स ऐकतो. वाचनासाठी एआयचाही वापर करतो. एखादा लेखक आवडला की त्याची सगळी पुस्तके घेतो. एआयचा उपयोग आपण कसा करतो त्यावर अवलंबून आहे. एआयचा उपयोग आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी होतो, असे मत ज्येष्ठ उद्योजक डॉ. आनंद देशपांडे यांनी व्यक्त केले.
पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे लिट फेस्टमध्ये 'माझी पुस्तकसफारी' या सत्रात डॉ. देशपांडे बोलत होते. प्रशांत गिरबने यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या सत्रात देशपांडे यांनी त्यांच्या आवडत्या पुस्तकांविषयी, वाचनाविषयीचे विश्व उलगडले.
देशपांडे म्हणाले, भोपाळमध्ये शिक्षण झाल्यावर 1979 ते 1984 या काळात आयआयटी खरगपूरमध्ये शिक्षण घेतले. आयआयटी खरगपूरचे ग्रंथालय चांगले होते. मात्र, पुढे अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये असताना वाचनाविषयी विचार बदलले. तेथील विद्यार्थ्यांचे खूप वेगवेगळे वाचन झालेले होते. त्यामुळे माझेही वाचन बदलले. वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचू लागलो, पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे वाचन होऊ लागले. भारतात परत येऊन कंपनी सुरू केली. काही कामानिमित्त अमेरिकेत जायचो, तेव्हा तिथून परत येताना पुस्तके आणायचो. त्यात प्रामुख्याने तांत्रिक, व्यवस्थापन अशा विषयांवरील पुस्तके असायची, असे देशपांडे यांनी सांगितले.
आपल्याकडे नोकऱ्यांचा दर्जा वाढायला हवा. आता नोकऱ्यांचे प्रमाण वाढणार नाही. कामाची कमी राहणार नाही, पण नोकऱ्या कमी होतील. त्यामुळे कामातून संधी निर्माण केल्या पाहिजेत. एकाचवेळी वेगवेगळी कामेही करता येतील. त्यामुळे नोकऱ्या देणारे तयार होण्याची गरज आहे, असेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.