

पुणे : महापालिका निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात भाजप-शिवसेना महायुती झाली असल्याने २९ महापालिकांत महायुतीचीच सत्ता येईल. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी त्यांना सत्तेत वाटा मिळणार नाही, असे स्पष्ट मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.
पुण्यातील श्रमिक पत्रकार संघ व पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी बावनकुळे शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात महसूलमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते त्या नात्याने त्यांना अनेक प्रश्न पत्रकारांनी विचारले, यावर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
- राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली मात्र अजित पवार युतीत का सहभागी नाही?
- राज्यात भाजप -शिवसेना अशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पक्षीय पातळीवर अजित पवार यांना तसे स्वातंत्र्य देण्यात आले. त्यामुळे फक्त पश्चिम महाराष्ट्रात महायुती झालेली नाही.
- शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जिंकून सत्ता स्थापनेचा दावा केला तर भाजपची भूमिका काय राहील?
- खरे तर भाजपचेच उमेदवार सर्वत्र मोठ्या संख्येने येथील शिवसेना (एकनाथ शिंदे ) आणि अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांना त्या पाठोपाठ जागा मिळतील. कारण भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी त्यांना सत्ता मिळणार नाही. त्याही पुढे त्यांना जास्त जागा मिळाल्या तरीही त्यांना सत्तेत वाटेकरी केले जाणार नाही. पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल.
-इतर युतीतूनही फोडाफोडी झाली तर काय करणार?
-कुठल्याही महायुतीचे उमेदवार एकमेकांसोबत घेऊ नये असे स्पष्ट केले आहे. पुण्यात किंवा पिंपरीत असे होणार नाही.
-२१ तारखेला काय होणार...तुमचे भाकित काय?
-स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वाधिक नगराध्यक्ष महायुतीचे असतील.
-माणिकराव कोकाटे यांच्याविषयी सरकारची भूमिका काय?
-हा न्यायालयाचा निर्णय आहे. त्याचा आम्ही मान राखतो. परंतु जी घटना पूर्वी घडली आहे. त्यामुळे या सरकारशी त्या घटनेचा संबंध नाही.
-पार्थ पवार यांच्यावरील जमीन घोटाळ्याच्या आरोपांत सरकार त्यांना वाचवत आहे काय?
-सरकार कोणालाही वाचवत नाही, तसे असते तर या प्रकरणातील आरोपींना १२ दिवस पोलिस कोठडी झालीच नसती. व्यवहार ज्यांच्यामध्ये झाला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांना सोडले जाणार नाही.
-महसूल विभागातील ताज्या घोटाळ्याबद्दल सरकारची भूमिका काय?
-आजच मुंबईत महसूल विभागाची बैठक झाली. 90 हजार ब्रास अधिक उत्खनन झाले हे सिद्ध झाले. त्यामुळे अधिकारी निलंबित करण्यात आलेत. जे निलंबित झाले त्यांना तीन दिवसांत खुलासा करायला सांगितले आहे. अनावधानाने केलेली चूक सरकार माफ करेल. मात्र मुद्दाम केलेल्या चुकीला माफी नाही. तहसीलदार सूर्यकांत येवले यांना नोकरीतून काढून का टाकू नये अशी नोटीस बजावली आहे.
-ड्रग प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले जात आहे.
-खरे तर शिंदे यांचे घेण्याची गरज नाही. काही जणांना ब्रेकिंगच्या नादात आरोप कारण्याची सवय लागली आहे.