

सुनील कडूसकर
पुणे: तिचं प्राथमिक अन् माध्यमिक शिक्षण लष्कर भागातील एका नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झालं. अभ्यासावर लक्ष केंद्रित राहावं, यासाठी तिला आम्ही शाळेच्या वसतिगृहात ठेवलं होतं. सातवीत असताना वसतिगृहातील काही वरच्या वर्गातील मुलींच्या 'पीअर प्रेशर'नं तिला गांजासेवनाकडे ढकललं. त्यातूनच तिला गांजाचं व्यसन जडलं. आज ती बारावीत असून, या व्यसनानं तिला पुरतं जखडलं आहे. त्यामुळे आमचं कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य हरवलं आहे...' ही आपबिती गांजाच्या आहारी गे लेल्या 'चित्रा' (नाव बदलले आहे) नावाच्या एका तरुणीच्या आईने 'पुढारी'शी बोलताना मांडली.
लष्कर भागातील इंग्रजी माध्यमाच्या एका नामवंत शाळेच्या वसतिगृहात राहत असताना सीनिअर मुलींच्या आग्रहामुळे तिने सिगारेट व इलेक्ट्रिक सिगारेटचे झुरके मारले. पुढे याच मैत्रिणींनी आणलेल्या गांजाचा कश तिने मारला. त्यामुळे आलेली गुंगी तिला आनंददायी वाटली; म्हणून रात्री होस्टेलच्या वॉर्डन झोपल्यावर ती व तिच्या मैत्रिणी दररोजच गांजाचे झुरके घेत आपल्याच मस्तीत राहू लागल्या.
शाळा सुटली तरी गांजामुळे निर्माण झालेले फ्रेंड सर्कल कायम राहिले. त्यामुळे कॅम्पात, विमाननगर परिसरात जाऊन ही मंडळी मौजमजेच्या नावाखाली ते पूर्णपणे व्यसनाधीन झाले. सोशल मीडियावरूनही असेच मित्र तिला मिळत गेल्याने ती या व्यसनाच्या विळख्यात पूर्णपणे अडकली. यातून बाहेर काढण्यासाठी हजारो रुपये फी भरून सहा महिन्यांपर्यंत तिला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले; परंतु तेथून परतल्यावर पुन्हा तिची पावले विमाननगरकडे वळली. गांजा घेतला की छान वाटते, चांगली झोप येते. एकटेपणाचे टेन्शन येत नाही, असे ती सांगायची. घरात गांजाचे झुरके ओढताना एकदा वडिलांनी तिला पाहिले व रागाच्या भरात खूप बदडले; पण त्यामुळे तिच्या वर्तणुकीत सुधारणा होण्याऐवजी ती बेताल व बेडर झाली. आता तर तिची भाषा, वर्तणूक, विचार करण्याची पद्धतीही विचित्र झाली आहे, असेही चित्राच्या आईने स्पष्ट केले.
गांजा कुठेही सहजपणे होतो उपलब्ध
पुण्यात कोठेही गांजा सहज उपलब्ध होतो. वारजे, कोथरूड, सनसिटी रोड, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, वाकडेवाडी, विमाननगर, कल्याणीनगर, वडगाव शेरी परिसरातील टपऱ्यांवर अगदी सहजी वीड (गांजा) मिळतो. ग्राहकाची सत्यता पटली की क्षणार्धात त्याला गांजाची पुडी मिळते. चित्रावर पाळत ठेवताना या गोष्टी निदर्शनास आल्या, असेही त्या म्हणाल्या.
व्यसनाधीन मुलांना कसे बाहेर काढावे?
या व्यसनापासून आपल्याला मुक्त व्हायचे आहे, अशी प्रबळ इच्छा असल्याशिवाय कोणीही यातून बाहेर पडू शकत नाही. व्यसनाधीन मुला-मुलींशी अत्यंत शांतपणे व संयमाने बोलावे. पैसे, सिगारेट वा अमली पदार्थ त्यांना सहजासहजी उपलब्ध होणार नाही, याकरिता विशेष काळजी घ्यावी. घरातील वातावरण चिंतामुक्त व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. व्यसनाधीन व्यक्तीला कोणत्याही घटनेचा ताण येणार नाही, याची काळजी घ्यावी.