

पुणे: पुणे-लोणावळा तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग, पुणे रेल्वेस्थानकावरील ताण आणि प्लॅटफॉर्मचा विस्तार, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, पुणे-दौंड-बारामती उपनगरीय लोकल सेवा (उपनगर दर्जा), नवीन अतिरिक्त गाड्यांची मागणी आणि पुण्यातून अमृत भारत आणि वंदे भारतचे विस्तारित जाळे यांसारख्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देऊन ते रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोडवावेत, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्यापासून (दि. १७) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे पुण्यातील रेल्वेशी निगडीत प्रश्नांवर ते काय भूमिका घेतात याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे. या दौऱ्यादरम्यान पुणे रेल्वेस्थानकाचा वाढता ताण, लोकल प्रवाशांचे प्रश्न आणि अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प यांसह विविध प्रश्नांकडे रेल्वेमंत्र्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, या दौऱ्यात मंत्र्यांनी पुणेकरांचे स्थानिक प्रश्न सोडवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पुणे रेल्वेस्थानकावरील ताण आणि प्लॅटफॉर्मचा विस्तार
पुणे रेल्वेस्थानकावरून दररोज शेकडो गाड्या आणि लाखो प्रवासी ये-जा करतात. परंतु, येथील अपुऱ्या प्लॅटफॉर्ममुळे गाड्या आऊटरला अनेकदा बाहेरच तासन् तास थांबवून ठेवाव्या लागतात. अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाचा कायापालट आणि नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्याची घोषणा झाली असली तरी या कामाला वेगाने सुरुवात करणे गरजेचे आहे. तसेच, हडपसर, शिवाजीनगर आणि खडकी या उपनगरांतील स्थानकांचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून सुरू असलेला विकास आणखी वेगाने पूर्ण करावा, जेणेकरून मुख्य स्थानकावरील ताण कमी होईल.
नवीन गाड्यांची मागणी आणि वंदे भारतचे जाळे
पुणे-मुंबईदरम्यान प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात हायस्पीड कॉरिडॉरची (मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद) चर्चा असली तरी प्रत्यक्ष जमिनीवर पुणे-मुंबई वंदे भारत आणि मुंबईसाठी अतिरिक्त इंटरसिटी गाड्यांची गरज आहे. तसेच, उत्तर भारत आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये पुण्यासाठी विशेष कोटा किंवा नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी आहे.
पुणे-लोणावळा तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग
पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील नोकरदार तसेच विद्यार्थ्यांसाठी पुणे-लोणावळा लोकल ही जीवनवाहिनी आहे. मात्र, या मार्गावर एक्स्प्रेस आणि मालगाड्या धावत असल्याने लोकलच्या फेऱ्या वाढवता येत नाहीत. पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकलची वारंवारता वाढवावी आणि प्रवाशांची गर्दीतून सुटका करावी, ही मुख्य मागणी आहे.
पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प
पुणे आणि नाशिक या दोन औद्योगिक शहरांना जोडणारा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पाला गती देऊन प्रकल्प मार्गी लावावा. जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचा आणि मालवाहतुकीचा मोठा प्रश्न सुटेल.
उपनगरीय लोकल सेवा वाढवावी
रेल्वेच्या दौंड, बारामती विभागाला उपनगर दर्जा देऊन या मार्गावर नियमित आणि पुरेशा प्रमाणात लोकल सेवा सुरू करण्यात यावी. अशी बऱ्याच वर्षांपासूनची प्रवाशांची मागणी आहे. ती उपनगरीय लोकल सेवा तातडीने पूर्ण करण्यात यावी.
पुणे रेल्वे विभाग रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देतो. मात्र, सुविधांच्या बाबतीत पुण्याच्या पदरात नेहमीच निराशा पडते. रेल्वेमंत्र्यांनी केवळ घोषणा न करता रखडलेल्या प्रकल्पांना थेट निधी आणि मंजुरी द्यावी, हीच आमची अपेक्षा आहे.
हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप