Pune Ganeshotsav Economy: पुण्यात गणेशोत्सवाने फिरवले तब्बल २ हजार कोटींचे अर्थचक्र!

मूर्ती, सजावट, मोदक-मिठाईपासून सोने-चांदीच्या अलंकारांपर्यंत जोरदार खरेदी; गतवर्षीपेक्षा २०० ते ३०० कोटींची वाढ
Ganeshotsav Market
Ganeshotsav MarketPudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: लाडक्या गणरायाच्या पाहुणचारात कोणतीही कसूर राहू नये म्हणून पुणेकरांनी यंदाही मुक्तहस्ते खर्च केला. गणेशमूर्ती, मखर, पूजासाहित्य, फुले-फळे, नारळ, मोदक-मिठाईपासून सोने-चांदीच्या अलंकारांपर्यंत खरेदीचा जोर राहिला. त्यात सार्वजनिक मंडळांचे भव्य मंडप, देखावे, विद्युतरोषणाई, ढोल-ताशा, डीजे आणि विसर्जन मिरवणुकीच्या खर्चाची भर पडली. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाने पुण्यातील बाजारपेठेत दोन हजार कोटी रुपयांचे अर्थचक्र फिरवल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत उलाढालीत २०० ते ३०० कोटी रुपयांची वाढ झाल्याचे जाणकारांनी सांगितले.

Ganeshotsav Market
Someshwar Election: 'सोमेश्वर'मध्ये शेतकरी कृती समिती ताकद आजमावणार, सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? मंगळवारी निर्णय घेणार

शहरातील लाखो घरांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना झाली. मूर्तीपासून मखर, सजावट, पूजासाहित्य, विद्युतमाळा, तोरणे आणि अन्य साहित्यावर प्रत्येक कुटुंबाने आपल्या ऐपतीनुसार खर्च केला. त्यामुळे मूर्ती आणि घरगुती गणेशोत्सवाशी निगडित बाजारपेठेतील व्यवहार ४५० ते ५०० कोटी रुपयांच्या घरात गेल्याचा अंदाज आहे. गणरायासाठी सोन्या-चांदीचे मुकुट, हार, मोदक, दुर्वा आणि अन्य अलंकार खरेदीची परंपरा कायम राहिल्याने सराफा आणि भेटवस्तूंच्या बाजारालाही उत्सवाचा मोठा हातभार लागला. गणेश दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर उसळलेल्या गर्दीनेही छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चांदी केली. हॉटेल, खाद्यपदार्थ, खेळणी, इमिटेशन ज्वेलरी, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी आणि अन्य वाहतूक व्यवसायाला मोठी चालना मिळाली. मूर्तिकारांपासून फुलविक्रेते, फळ-नारळ व्यापारी, मिठाई विक्रेते, सराफ, मंडप व्यावसायिक, सजावटकार, वादक, वाहतूकदार ते रस्त्यावरील छोट्या विक्रेत्यांपर्यंत हजारो हातांना बाप्पाने काम आणि कमाई दिली.

Ganeshotsav Market
Shirur News: गणेशोत्सवाच्या पंगतीला गेले अन् इकडे चोरांनी घर फोडले; शिरुर तालुक्यातील घटना

फुले, फळे अन् नारळाने भरली बाजाराची ओटी

गणेशोत्सवामुळे गुलटेकडी मार्केट यार्डासह शहरातील किरकोळ बाजारात फुले, फळे आणि नारळाच्या खरेदीला मोठा वेग आला. गणपतीसह गौराईच्या पूजेसाठी झेंडू, शेवंती, गुलछडी, डच गुलाब, कमळ, दुर्वा, शमी आणि विविध प्रकारच्या पत्रीला मोठी मागणी राहिली. फुले, हार आणि पूजेसाठी लागणाऱ्या पानांच्या व्यापारातून १०० ते १२५ कोटी, तर फळे आणि नारळाच्या विक्रीतून १२५ ते १५० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. एकट्या नारळाचीच उत्सवकाळात दररोज लाखोंच्या संख्येने विक्री झाली.

मंडप-देखाव्यांचा सर्वाधिक वाटा

सार्वजनिक गणेशोत्सवाने मंडप आणि सजावट व्यवसायाला सर्वाधिक आर्थिक बळ दिले. जिवंत व हलते देखावे, भव्य महाल, पौराणिक प्रतिकृती, विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, साऊंड आणि जनरेटरवर मंडळांनी हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत खर्च केला. सार्वजनिक मंडळे, सोसायट्या, संस्था आणि विविध समूहांचा विचार करता या क्षेत्रातील उलाढाल ४०० ते ४५० कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचा अंदाज आहे. ढोल-ताशा पथके, मिरवणुकीच्या व्यवस्थेतून आणखी १२५ ते १५० कोटी रुपयांच्या व्यवसायाला हातभार लागला.

Ganeshotsav Market
Engineering Career Opportunities: अभियांत्रिकी क्षेत्रात संधींचे नवे विश्व; एआय, रोबोटिक्स, ई-वाहनांसह नव्या तंत्रज्ञानाला मोठी मागणी

असे फिरले दोन हजार कोटींचे अर्थचक्र

  • मूर्ती, मखर, सजावट व पूजासाहित्य - ४५० ते ५०० कोटी

  • मंडप, देखावे व विद्युतरोषणाई - ४०० ते ४५० कोटी

  • मोदक, मिठाई, फराळ व प्रसाद - २०० ते २२५ कोटी

  • फळे व नारळ - १२५ ते १५० कोटी

  • फुले, हार, दूर्वा व पत्री - १०० ते १२५ कोटी

  • ढोल-ताशा, डीजे, मिरवणूक व वाहतूक - १२५ ते १५० कोटी

  • सोने-चांदी, अलंकार व भेटवस्तू - १७५ ते २०० कोटी

  • हॉटेल, खाद्यविक्री, खेळणी व अन्य व्यवसाय - २०० ते २२५ कोटी

  • एकूण अंदाजित अर्थचक्र - १ हजार ७७५ ते २ हजार २५ कोटी

मोदक-मिठाईत कोट्यवधींचा ‘गोडवा’

‘मोदकप्रिय’ बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीच्या पारंपरिक मोदकांबरोबरच मावा, केशर, चॉकलेट, ड्रायफ्रुट आणि गुलकंदच्या मोदकांना मोठी मागणी राहिली. पेढे, बर्फी, लाडू तसेच गौराईच्या फराळाच्या खरेदीने मिठाई बाजारातही गोडवा वाढवला. मोदक, मिठाई, फराळ आणि प्रसादाच्या विक्रीतून २०० ते २२५ कोटींचा व्यवहार झाल्याचा अंदाज आहे.

प्रत्येक विक्रेत्याच्या पदरात काही ना काही कमाई पडली

दहा दिवसांच्या उत्सवात बाप्पाने केवळ पुणेकरांच्या घराघरांत आनंद आणला नाही, तर शहराच्या अर्थचक्रालाही मोठी गती दिली. मोठ्या व्यावसायिकांपासून हातावर पोट असलेल्या छोट्या विक्रेत्यांपर्यंत प्रत्येकाच्या पदरात काही ना काही कमाई पडली. भक्ती, उत्साह आणि रोजगाराची सांगड घालत गणरायाने यंदा पुण्याच्या बाजारपेठेत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल घडवल्याचे चित्र आहे.

Ganeshotsav Market
Pune Anant Chaturdashi Rain: अनंत चतुर्दशीला पुण्यात जोरदार पावसाची शक्यता; विसर्जन मिरवणुकीवर जलाभिषेकाची शक्यता

गणेशोत्सव आणि गौराईमुळे फुलांच्या बाजाराद यंदा झेंडू, शेवंती, गुलछडी, डच गुलाबासह हार, दूर्वा आणि पत्रीला मोठी मागणी राहिली. घरगुती गणपतींबरोबरच सार्वजनिक मंडळांकडून सजावटीसाठी मोठी खरेदी झाली. त्यामुळे उत्पादकांपासून अडते, विक्रेते आणि कामगारांपर्यंत सर्वांनाच गणेशोत्सवाने आर्थिक बळ दिले.

सागर भोसले, फूल अडतदार, मार्केट यार्ड

गणरायाला सोन्या-चांदीचे मुकुट, हार, दूर्वा, मोदक तसेच विविध अलंकार अर्पण करण्याकडे भाविकांचा कल वाढत आहे. घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांकडूनही चांदीच्या पूजासाहित्याला मागणी राहिली. उत्सवकाळातील खरेदीमुळे दागिने आणि चांदीच्या वस्तूंच्या विक्रीला चांगली चालना मिळाली.

मयूर देवकर, संचालक, देवकर ज्वेलर्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news