

पुणे: शहरात २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीवर जोरदार जलाभिषेक होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अन् राजस्थानातून परतीला निघालेला मान्सून २४ ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्याच्या सीमेवर येत असल्याने गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवर जोरदार जलधारा बरसण्याची शक्यता आहे. रविवारी (दि. 20) शहरातील काही भागात पावसाने हजेरी लावली.
रविवारी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यानच शहराला चारही बाजूंनी ढगांनी घेरले अन् काळोख पडला. आभाळ ढगांनी भरून आले, गार वारा सुटला. भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. हडपसर आणि वानवडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने रस्ते जलमय झाले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर इतर भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली. हडपसर, वानवडी, मगरपट्टा, कोरेगाव पार्क भागात पाऊस झाला.
२५ सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता
२५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्याच सुमारास परतीचा मान्सून राज्याच्या सीमेवर येत असल्याने पुणे शहर आणि पुणे घाट माथ्याला यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला येताना छत्री, रेनकोट घेऊन बाहेर पडावे, असे वातावरण तयार झाले आहे. रविवारी शहरात झालेला पाऊस... हडपसर १५, वानवडी २०, मगरपट्टा ५, कोरेगाव पार्क २.५.