

पुणे: बाप्पाच्या आगमनानिमित्त गणेशभक्तांमध्ये आनंद आणि उत्साह संचारला आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले असून, मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांकडून श्रीगणेशाचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. ढोल-ताशा पथकांच्या वादनाचा निनाद, बँड पथकांचे बहारदार वादन आणि 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष, अशा चैतन्यपूर्ण वातावरणात पुण्याच्या गणेशोत्सवातील मिरवणुकीची वैभवशाली परंपरा सोमवारी (दि. १४) श्रीगणेश चतुर्थीला गणेशभक्तांना अनुभवायला मिळणार आहे. भक्तिमय वातावरणात मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या श्रीगणेशाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंडळांचे उत्सव मंडप फुलांनी सजविण्यात आले असून, विद्युतरोषणाईने उजळून निघाले आहेत. गणरायाच्या आगमनामुळे शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
फुलांनी सजविलेल्या उत्सव मंडपात बाप्पा विराजमान होणार
यंदाचा गणेशोत्सव बारा दिवसांचा असल्याने गणेशभक्तांचा उत्साह आणखी द्विगुणित झाला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त आणि मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. सकाळी वाजतगाजत मिरवणुका निघणार असून, सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर, भक्तांचे लक्ष वेधून घेणारे नगारावादन, ढोल-ताशा पथकांचा निनाद, बँड पथकांचे वादन, फुलांनी सजविलेला रथ आणि पारंपरिक पेहरावातील उत्साही कार्यकर्ते, असे वातावरण शहरासह उपनगरांत पाहायला मिळणार आहे. सोमवारी श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या श्रीगणेशमूर्तींची सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तर, शहर आणि उपनगरातील विविध मंडळांच्या श्रीगणरायाच्या मूर्तींची उत्साहपूर्ण वातावरणात प्राणप्रतिष्ठा होईल. फुलांनी सजविलेल्या आणि विद्युतरोषणाईने उजळलेल्या उत्सवमंडपात बाप्पा विराजमान होणार आहेत.
श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
प्राणप्रतिष्ठेची वेळ : सकाळी ११ वाजून ४५ मिनिटे, हस्ते : वेदमूर्ती देवव्रत रेखे
श्री कसबा गणपतीच्या आगमन मिरवणुकीला सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी उत्सव मंडपातून सुरुवात होणार आहे. रास्ता पेठ येथील मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांच्याकडून घेतलेली श्रीगणेशमूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात येणार आहे. रास्ता पेठ पॉवर हाऊस, दारूवाला पूल, देवाजीबाबा चौक, फडके हौद या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपाकडे मार्गक्रमण करेल. प्रभात बँड पथक, संघर्ष ढोल-ताशा पथक, ज्ञानप्रबोधिनी युवक विभाग आणि शौर्य ढोल-ताशा पथकांचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. मिरवणूक उत्सव मंडपात आल्यानंतर श्रीगणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आगमन मिरवणूक वेधणार लक्ष
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते सोमवारी (दि. १४) दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहात बाप्पाची आगमन मिरवणूक देखील निघणार आहे.
श्रीगणेश चतुर्थीला सोमवारी सकाळी श्रीगणेशाची आरती होईल. त्यानंतर उत्सव मंडपातून सव्वाआठ वाजता श्रीगणेशाची आगमन मिरवणूक सुरू होईल. या मिरवणुकीत श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधिनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ, शिवाय, इंद्रगर्जना, केशव शंखनादही मिरवणुकीत वादन करणार आहेत. याशिवाय, आढाव बंधू यांचा नगरखाना आणि मर्दानी खेळही मिरवणुकीत पाहायला मिळणार आहेत. सकाळी सव्वाआठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. भवनापासून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने पुढे बुधवार चौकात आणि येथून तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्तामार्गे या मिरवणुकीचे आगमन श्रीगणेश सुवर्णधाम या सजावट मंदिरात होणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची माहिती मंडळाचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी दिली.
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ
प्राणप्रतिष्ठेची वेळ : दुपारी १२ वाजून १५ मिनिटे, हस्ते : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे (आळंदी) विश्वस्त योगी निरंजननाथ गुरू शांतिनाथ, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे १३४ वे वर्ष आहे. गणरायाच्या आगमन मिरवणुकीला सकाळी १० वाजता न. चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून सुरुवात होणार आहे. कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौकमार्गे मिरवणूक उत्सव मंडपात पोहचेल. श्रीगणरायाची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान असणार आहे. मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड पथक, ताल पथक आणि विष्णुनाद शंख पथकाचे वादन ऐकायला मिळणार आहे.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ
प्राणप्रतिष्ठेची वेळ : दुपारी १ वाजता, हस्ते : युवा उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन. गुरुजी तालीम मंडळाचे यंदाचे १४० वे वर्ष आहे. गणरायाच्या आगमन मिरवणुकीला सकाळी ११ वाजता ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात होणार आहे. स्वप्निल सरपाले आणि सुभाष सरपाले यांनी साकारलेल्या फुलांच्या रथातून मिरवणूक निघणार आहे. गुरुजी तालीम मंदिर गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात येईल. जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड तसेच गुरुजी प्रतिष्ठान, शिवतेज, शिवरुद्र, शिवताल, रुद्रतेज आणि कलावंत ढोल-ताशा पथकांचे बहारदार वादन होणार आहे.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग मंडळ ट्रस्ट
प्राणप्रतिष्ठेची वेळ : दुपारी १२ वाजून ३० मिनिटे, हस्ते : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज. गणरायाच्या आगमन मिरवणुकीला सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. गणपती चौक, लक्ष्मी रस्ता, नगरकर तालीम चौक, बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, मजूर अड्डा चौक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, समाधान चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गाने मिरवणूक उत्सवमंडपात पोहचेल. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधूंचा नगारावादनाचा गाडा असणार असून, रुद्रांग, ओम आणि स्वर्णाक्ष या पथकांचे उत्कृष्ट वादन गणेशभक्तांना ऐकायला मिळणार आहे. उत्सव मंडपात श्रीगणरायाच्या मूर्तीची पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
मानाचा पाचवा केसरीवाडा
प्राणप्रतिष्ठेची वेळ : सकाळी ११ वाजून ४५ मिनिटे, हस्ते : डॉ. रौनक रोहित टिळक. केसरीवाडा गणेशोत्सवाचे यंदाचे १३३ वे वर्ष आहे. गणरायाच्या आगमन मिरवणुकीला सकाळी ९ वाजता रमणबाग चौकातून सुरुवात होणार आहे. प्रथेप्रमाणे पालखीतून मिरवणूक निघणार आहे. रमणबाग चौक, शिंदेपार चौक, ओंकारेश्वर मंदिर, वर्तक उद्यान, नारायण पेठ पोलिस चौकी, न. चिं. केळकर रस्ता या मार्गाने मिरवणूक उत्सवमंडपात दाखल होईल. मिरवणुकीत बिडवे बंधू यांचे सनई-चौघडावादन, श्रीराम आणि कलावंत ढोल-ताशा पथकांचा सहभाग असणार आहे. वेदमूर्ती कौस्तुभ खळीकर हे पौरोहित्य करणार आहेत. या वेळी केसरी गणेशोत्सवाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. गीताली टिळक आणि विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख श्रीगणेश मंडळे
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
प्राणप्रतिष्ठेची वेळ : सकाळी ११ वाजून ११ मिनिटे, हस्ते : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामी महाराज. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवाचे यंदाचे १३४ वे वर्ष आहे. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या मयूररथातून श्रीगणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत गंधाक्ष ढोल-ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँडचे बहारदार वादन होणार आहे. विविध प्रकारच्या आकर्षक फुलांनी रथ सजविण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर उत्सवमंडपात दुपारी १२ वाजल्यापासून भाविकांना श्रीगणरायाचे दर्शन घेता येणार आहे.
अखिल मंडई मंडळ
प्राणप्रतिष्ठेची वेळ : दुपारी १२ वाजता, हस्ते : डॉ. विनय थोरात आणि प्रतिभा थोरात. अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची सकाळी १० वाजता फुलांनी सजविलेल्या भव्य पुष्परथातून आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे १३३ वे वर्ष आहे. मंडई पोलिस चौकी, रामेश्वर चौक, गोटीराम भैया चौक, मेट्रो स्टेशनमार्गे उत्सवमंडप, असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बँड पथक आणि वाद्य पथके असतील. समर्थ आणि तालचक्र ढोल-ताशा पथकांचाही मिरवणुकीत सहभाग असणार आहे.
हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट
प्राणप्रतिष्ठेची वेळ : सकाळी ११ वाजून ३० मिनिटे, हस्ते : कलाकार निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे. नवसाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टच्या श्रीगणेशाची आगमन मिरवणूक सकाळी ९ वाजता निघणार आहे. मंडई पोलिस चौकी, शनिपार चौक, बाजीराव रस्ता, वैभव चौक, लक्ष्मी रस्ता, समाधान चौक, रामेश्वर चौक, बाबू गेनू चौक येथील उत्सवमंडप, असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. मिरवणुकीमध्ये पाच राजहंस अग्रभागी असतील आणि श्रीगणेशाची मूर्ती कमळामध्ये विराजमान असेल. रंगबिरंगी फुलांनी सजविलेल्या रथातून बाप्पाची मिरवणूक निघणार आहे. रुद्रगर्जना, नूमवि, मोरया, नादब्रह्म आणि छत्रपती या पथकांचे वादन मिरवणुकीत होणार आहे.