Wada Gram Panchayat No Confidence Motion: वाडा ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप; उपसरपंच रोहिदास शेटेंविरोधात बहुसंख्य सदस्यांचा अविश्वास ठराव

मनमानी कारभाराचा आरोप; सरपंचांसह ९ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या, खेड तहसीलदारांकडे विशेष सभेची मागणी
Wada Gram Panchayat No Confidence Motion
Wada Gram Panchayat No Confidence MotionPudhari
Published on
Updated on

राजगुरुनगर: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या वाडा ग्रामपंचायतीमध्ये मोठा राजकीय स्फोट झाला आहे. वाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोहिदास महादेव शेटे यांच्या मनमानी आणि एकाधिकारशाही कारभाराला कंटाळून बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध थेट अविश्वास ठराव दाखल केला आहे. रोहिदास शेटे हे स्वर्गीय सहकार महर्षी बाळासाहेब शेटे यांचे लहान बंधू तसेच कात्रज डेअरीचे माजी संचालक व वाडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन चंद्रशेखर शेटे यांचे सख्खे चुलते आहेत. एकीकडे सोसायटीत स्वतःचे राजकीय वजन दाखवणाऱ्या चंद्रशेखर शेटे यांच्या चुलत्याचीच ग्रामपंचायतीत 'विकेट' काढण्याची रणनीती आखल्याने संपूर्ण खेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Wada Gram Panchayat No Confidence Motion
Non Teaching Staff Recruitment: शिक्षकेतर भरतीला वेग; वैयक्तिक मान्यतेसाठी ‘नॉन-टीचिंग पोर्टल’

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर उपसरपंच पदाची खुर्ची ही अल्प कालावधीसाठी देण्याचे ठरले होते. ठरलेल्या मुदतीनुसार रोहिदास शेटे यांनी पदाचा राजीनामा देऊन इतर सदस्यांना संधी देणे अपेक्षित होते. मात्र, दिलेल्या शब्दाला हरताळ फासत त्यांनी पदावर अडून राहण्याची भूमिका घेतली. त्यांच्या याच मनमानी आणि सहकाऱ्यांना गृहीत धरण्याच्या वृत्तीमुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. अखेर संयमाचा बांध फुटल्याने सरपंच रुपाली शिवाजी भारे यांच्यासह बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत खेड तहसील कार्यालयात रोहिदास शेटे यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाचा अधिकृत अर्ज दाखल केला. 10 सप्टेंबर 2026 रोजी दाखल करण्यात आलेल्या या अर्जावर तातडीने कायदेशीर कार्यवाही करून विशेष सभा बोलावण्याची मागणी सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

Wada Gram Panchayat No Confidence Motion
Overseas Education Scholarship: परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी ६८ विद्यार्थ्यांची निवड; ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिकेत उच्च शिक्षणाची संधी

या संपूर्ण राजकीय संघर्षाला वाडा सोसायटीमधील 'पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक' प्रतिनिधी निवडीची थेट किनार असल्याची जोरदार चर्चा गावात सुरु आहे. वाडा सोसायटीचे विद्यमान चेअरमन चंद्रशेखर शेटे यांनी स्वतःचा पीडीसीसी बँक प्रतिनिधीचा ठराव मोठ्या हुशारीने मंजूर करुन घेतला. मात्र, सोसायटीत स्वतःची पोळी भाजून घेत असतानाच, त्यांच्या स्वतःच्या गावात आणि ग्रामपंचायतीत चुलते रोहिदास शेटे यांच्यावर अविश्वासाची नामुष्की ओढवली आहे . त्यामुळे सोसायटीत विजय मिळवला तरी ग्रामपंचायतीत मोठा राजकीय सेटबॅक बसल्याने चंद्रशेखर शेटे यांना हा अत्यंत जिव्हारी लागणारा दणका मानला जात आहे.

Wada Gram Panchayat No Confidence Motion
Samagra Progress Report: ‘समग्र प्रगतिपुस्तिका’ची राज्यस्तरावर झाडाझडती; अधिकाऱ्यांना १५ शाळांची तपासणी बंधनकारक

या संपूर्ण अविश्वास नाट्याची पडद्यामागची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हलवल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व असंतुष्ट सदस्यांची मोट बांधून त्यांनी शेटे यांच्या राजकीय मक्तेदारीला जोरदार आव्हान दिले आहे. वाडा सोसायटीच्या बँक प्रतिनिधी निवडीचे जिल्हा परिषद सदस्य समिर सुपे उट्टे काढणार? असे मानले जात असून या बाबत विचारणा करता या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य समीर दादा सुपे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत शेटे यांच्या कारभाराचा पंचनामा केला. ते म्हणाले कीः"चंद्रशेखर सुरुवातीला आम्हाला असे सांगितले होते की, 'मला बँकेचा प्रतिनिधी द्या, म्हणजे माझ्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी मला माजी आमदारांकडे जाता येईल व ती कामे मार्गी लावता येतील.' आम्ही त्यावर विश्वास ठेवला; मात्र ऐनवेळी त्यांनी दिलेला शब्द बदलून अत्यंत संभ्रमित आणि दुटप्पी भूमिका घेतली.

Wada Gram Panchayat No Confidence Motion
Pune Loudspeaker Controversy: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ परवानगीवरून वाद; पोलिसांच्या निर्णयावर पुणेकर मंचाचा आक्षेप

सोसायटीमध्ये स्वतःचे चेअरमनपद केवळ दोन वर्षांसाठीच ठरलेले असताना, उर्वरित संचालकांना अजिबात विश्वासात न घेता त्यांनी स्वतःची एकाधिकारशाही सुरुच ठेवली. दुर्दैवाने, जी एकाधिकारशाही सोसायटीत चालवली, तीच मनमानी आणि हुकूमशाही ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे चुलते रोहिदास शेटे यांनीही सुरु ठेवली होती. कोणालाही विश्वासात न घेणे, शब्द न पाळणे आणि गावाला वेठीस धरणे हीच यांची कार्यपद्धती झाली होती. म्हणूनच अखेर नाईलाजास्तव वाड्याच्या स्वाभिमानासाठी आणि गावाच्या विकासासाठी आम्हाला उपसरपंचांवर हा अविश्वास ठराव दाखल करावा लागला आहे."

वाडा ग्रामपंचायतीमध्ये दाखल झालेल्या या अविश्वास अर्जावर सरपंच रुपाली शिवाजी भारे यांच्यासह महेश लक्ष्मण नेहरे, नीलेश शिवाजी घनवट, प्रतिमा नीलेश वांभुरे, सुनंदा संजय भोसे, सुरेश विनोद सुपे, दगडू ज्ञानदेव भांगे, दिलीप शंकर सुपे, सुभद्रा बाळासाहेब आहेर यांच्या स्वाक्षरी आहेत. आता खेड तहसीलदार यावर कधी विशेष सभा आयोजित करतात आणि या विशेष सभेत रोहिदास शेटे यांच्यावर अविश्वासाचा शिक्कामोर्तब कसा होतो, याकडे संपूर्ण पश्चिम पट्ट्यासह खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकंदरीत, वाड्याच्या राजकारणातील या आक्रमक खेळीने तालुक्यात आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेल्याचे स्पष्ट दिसत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news