

पुणे: पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ दहा दिवसांचा उत्सव नसून, बदलत्या समाज जीवनाचे प्रतिबिंब मानले गेले. काळानुसार मांडवापासून सजावटीपर्यंत, मूर्तीपासून देखाव्यांपर्यंत आणि पारंपरिक वादनापासून आधुनिक ध्वनियंत्रणेपर्यंत त्याचे स्वरूप बदलत गेले. चार-पाच दशकांतील हा बदल तंत्रज्ञानाइतकाच सामाजिक आणि आर्थिक बदलांचाही प्रवास असल्याचे गणेश मंडळांचे ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात.
पूर्वी मांडव उभारण्यासाठी म्हणजे १९७० च्या काळात कार्यकर्ते स्वतः खड्डे खोदून मांडव उभारायचे, नाट्य, संगीत किंवा कला सादर करण्यासाठी मंडळाचेच कार्यकर्ते दोन तीन महिने अगोदर रंगीत तालीम करत असायचे. देशभक्तिपर, समाजप्रबोधनात्मक माहितीसंदर्भात नाट्य, पद तोंडी सादर केले जात असत.
रात्रंदिवस ही कला सादर केली जात असून, ही कला पाहण्यासाठी गणेशभक्तांची पहाटेपर्यंत गर्दी असायची आणि तितक्याच आनंदाने दाद देखिल मिळायची. मात्र, १९८० ते ९० च्या दशकात बदलत्या काळानुसार गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी देखील कात टाकली. पुढे खड्डेविरहित मांडव, लोखंडी व गॅल्व्हनाइज्ड स्ट्रक्चर, फायबरच्या रचना आल्या. त्यानंतर बंगाली मांडवांच्या प्रभावामुळे कापडाच्या घड्या, वळ्या आणि आकर्षक रचना दिसू लागल्या. वाहतुकीचा प्रश्न वाढल्यानंतर रस्त्यावर कमानीसारखे मांडव उभारण्याची पद्धत आली. त्यामुळे मांडव वर आणि वाहतूक खाली, अशी रचना निर्माण झाली, असे आनंद सराफ सांगतात.
सजीव देखाव्यांना प्राधान्य
राजेशाही महाल, झुंबर, हंड्या आणि कारंज्यांपासून देवदेवतांच्या प्रतिकृती, कथात्मक देखावे, बोलके देखावे आणि अखेर सजीव देखावे, असा हा प्रवास झाला. तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय घडामोडीही देखाव्यांमधून मांडल्या जाऊ लागल्या. आता अनेक मंडळांनी 'लाईव्ह शो', वैज्ञानिक आणि सामाजिक विषयांवरील सजीव देखाव्यांना प्राधान्य दिले असून, या सर्वात गणेश मिरवणुकीवर लक्ष वेधले गेले असल्याचे सराफ यांनी नमूद केले.
तर, गेल्या चार दशकांत जवळपास प्रत्येक दहा वर्षांनी उत्सवाचे स्वरूप बदलले. सुरुवातीला रोषणाईचे आकर्षण होते; त्यानंतर भव्य मूर्ती आणि हलते देखावे आले. अलीकडच्या काळात मध्यवर्ती पुण्यातील अनेक मंडळांनी सजीव देखाव्यांकडे वळण घेतले आहे. मेट्रो, वाढलेली सार्वजनिक वाहतूक आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमुळे आता गणेशोत्सवातील देखावे दिवसभर पाहिले जात असल्याने सजावटीला पुन्हा महत्त्व मिळत असल्याच्या आठवणी पीयूष शहा यांनी जाग्या केल्या.
मिरवणुकीतील ध्वनियंत्रणेवरील खर्च वाढला
त्यातच सुरुवातीच्या काळात तालीम, आखाडे, मेळे आणि नंतर गायनाच्या कार्यक्रमांना महत्त्व होते. पुढे ऑर्केस्ट्राचा काळ आला. मिरवणुकाही बदलत गेल्या. पूर्वी प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून होणारी मिरवणूक पुढे लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्त्यापर्यंत विस्तारली. या बदलांमध्ये डीजे हा सध्याचा टप्पा ठरला. ढोल-लेझीम, लाठी-काठी आणि आखाड्यांची परंपरा कमी होत गेल्यानंतर झटपट पर्याय म्हणून स्पीकर आले आणि १९९० च्या दशकात त्यांचा वापर वाढू लागला, असे रवींद्र माळवदकर सांगतात. मात्र, या बदलाचा एक परिणाम म्हणजे सजावटीवरील खर्च कमी होऊन मिरवणुकीतील ध्वनियंत्रणेवरील खर्च वाढला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
हा काळही जाईल...
सद्य परिस्थिती पाहता, ध्वनिव्यवस्थेतील बदल महत्त्वाचा मुद्दा झाला असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची हा मुद्दा अधिक परिणाम ठरत आहे. ढोल-लेझीम, भजने आणि पारंपरिक वाद्यांपासून मोठ्या ध्वनियंत्रणांपर्यंत झालेल्या प्रवासात डीजे हा पुढचा टप्पा ठरला असला, तरी नक्कीच यामध्ये बदल होणार हे नक्की. केवळ त्यासाठी काही कालावधी लागेल, थेट डीजे बंद होणार नाही, त्याला कालावधी जाऊ द्यावा लागेल, हे नक्की असे गणेश मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात.