

पुणे: श्रीगणेशाची मूर्ती साकारताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर उमटलेला आनंद... शाडू मातीपासून तयार केलेली श्रीगणरायाची सुंदर मूर्ती... अन् पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश....अशा उत्साहपूर्ण वातावरणात मंगळवारी (दि. ८) 'माझा बाप्पा २०२६' उपक्रमांतर्गत शाडू मातीपासून श्रीगणेश मूर्तीनिर्मितीची कार्यशाळा छत्रपती शिवाजीनगर येथील प्रियदर्शनी पुणे पोलिस पब्लिक स्कूलमध्ये रंगली. पुढारी माध्यम समूह, पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वतःच्या हातांनी बाप्पाची मूर्ती घडविण्याचा आनंद घेतानाच शाडूमातीचे पर्यावरणीय महत्त्वही विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. तसेच, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धारही त्यांनी केला.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव निर्माण व्हावी तसेच शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कला त्यांना अवगत व्हावी, या उद्देशाने 'माझा बाप्पा २०२६' उपक्रमांतर्गत शहरातील विविध शाळांमध्ये मूर्तीनिर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी प्रियदर्शनी पुणे पोलिस पब्लिक स्कूलमध्ये ही कार्यशाळा झाली. प्रियदर्शनी पुणे पोलिस पब्लिक स्कूलच्या समन्वयक सविता सिंह या वेळी उपस्थित होत्या. सॉलिटर ग्रुप, गोयल गंगा ग्रुप, बढेकर ग्रुप, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रा. लि. आणि केले ग्रुप हे या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत.
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या शिल्पकला विभागाचे प्रमुख सुनील देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाबाबतची माहिती सांगितली. सुनील देशपांडे यांच्यासह भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सचे प्रा. ओंकार पवार तसेच एकनाथ हुलगुंडे, श्रीरंग घोलप, तेजस राठोड, जिज्ञासा कुंभार, कीर्ती मुळे, सतीश कीर्तिकर आणि राकेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मूर्तीनिर्मितीचे प्रशिक्षण दिले. सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विद्यार्थ्यांनी हातून आकर्षक श्रीगणेशमूर्ती साकारल्या. या कार्यशाळेत केवळ मूर्तीनिर्मितीचे प्रशिक्षण न देता त्यामागील पर्यावरणपूरक विचारही विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याची गरज, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या पर्यावरणपूरक मूर्तीची घरी प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्धारही अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
'स्वतःच्या हाताने बाप्पा साकारण्याचा आनंद'
'लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने साकारताना खूप आनंद झाला. त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे किती महत्त्वाचे आहे, हेही या कार्यशाळेतून समजले,' असे विद्यार्थी साईश परदेशी याने सांगितले. 'मैत्रिणींसोबत मिळून कार्यशाळेत बाप्पाची मूर्ती साकारली. खूप मजा आली. शाडू मातीपासूनही सुंदर आणि उत्कृष्ट गणेशमूर्ती तयार करता येते, हे समजले,' असे सान्वी कारकुड हिने सांगितले.
पर्यावरणाचे संवर्धन आणि रक्षण करण्यासाठी पीओपीच्या मूर्तींपेक्षा शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे, ही काळाची गरज आहे. पुढारी माध्यम समूहाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत प्रियदर्शनी पुणे पोलिस पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने आणि एकाग्रतेने बाप्पाच्या विविध रूपांतील मूर्ती साकारल्याचे पाहून आनंद झाला. अशा उपक्रमांमधून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला हे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे वळणे गरजेचे आहे.
सविता सिंह, शाळा समन्वयक, प्रियदर्शनी पुणे पोलिस पब्लिक स्कूल, छत्रपती शिवाजीनगर