Katraj Kondhwa Road: कात्रज-कोंढवा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; वर्षभरात २१ बळी, तरीही काम रखडलेलेच

अपूर्ण रुंदीकरण, खड्डे, धोकादायक यू-टर्न अन् विजेचे खांब कायम; मार्च २०२७ पर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट
Katraj Kondhwa Road Widening
Katraj Kondhwa Road WideningPudhari
Published on
Updated on

पुणे: कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना आजवर सुरक्षित आणि सलग रस्ता मिळालेला नाही. अपूर्ण रुंदीकरण, रस्त्यावरील खड्डे, न हटविलेले विजेचे खांब, रखडलेले भूसंपादन आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली बदललेली वाहतूक व्यवस्था यामुळे हा मार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहे. गेल्या वर्षभरात २१ नागरिकांनी वेगवेगळ्या अपघातात जीव गमावले असून, प्रशासनाकडून पाहणी दौरे आणि काम पूर्ण करण्याच्या घोषणा सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र कायम आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Maza Bappa 2026: विद्यार्थ्यांच्या हातून साकारला पर्यावरणपूरक बाप्पा; ‘माझा बाप्पा २०२६’मध्ये शाडू मातीच्या मूर्तीनिर्मितीची कार्यशाळा

सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

सिल्व्हर ओक सोसायटीसमोर मंगळवारी झालेल्या अपघातात दहावीतील १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या अपघाताची स्वतंत्र चौकशी पोलिसांकडून केली जाणार असली, तरी या घटनेमुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपलब्ध जुन्या नोंदीनुसार या मार्गावर आतापर्यंत सुमारे २४ जणांचा बळी गेला आहे. त्यानंतरची एकत्रित अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष मृतांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Pune Ganesh Idol Prices: होर्मुझच्या अस्थिरतेचा बाप्पाच्या रंगांवर परिणाम; गणेशमूर्ती २० ते ३० टक्क्यांनी महाग

धोकादायक यू-टर्न; उलट्या दिशेने वाहनांची ये-जा

कात्रज चौक ते राजस सोसायटीदरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने कपिलामृत डेअरीजवळ यू-टर्न देण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी वाहतुकीचा मोठा गोंधळ निर्माण होत आहे. कात्रज तलावाजवळील कचरा रॅम्पमधून बाहेर पडणारी महापालिकेची अवजड वाहने उलट्या दिशेने यू-टर्नकडे येत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. कोंडी वाढल्यानंतर माऊलीनगरकडून येणारे काही वाहनचालकही विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा धोकादायक परिस्थितीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुरेसे वॉर्डन उपलब्ध नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Pune Ganeshotsav DJ Dolby: डीजेच्या दणदणाटापेक्षा ढोल-ताशांचा निनादच गणेशोत्सवाची खरी ओळख!

मार्च २०२७ चे उद्दिष्ट; काम मात्र रखडलेलेच

महापालिका आयुक्तांनी कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, दहा मालमत्तांचे भूसंपादन आणि विजेचे खांब हटविण्याचे काम ऑगस्टमध्येही प्रलंबित होते. आदेश देऊनही काही विजेचे खांब अद्याप रस्त्यातच असल्याचे समोर आले आहे. पथ विभागाकडून खड्डे बुजविण्याचे काम होत नाही, विद्युत विभागाकडून खांब हटविले जात नाहीत आणि भूसंपादन विभागाकडून सलग जागा उपलब्ध होत नाही. विविध विभागांतील या विसंवादाचा फटका मात्र थेट नागरिकांना बसत आहे. विभागांच्या समन्वयाअभावी नागरिकांनी आपल्या जीवाची किंमत का मोजावी?, असा सवाल उपस्थित होत आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Pune Ganeshotsav Noise Pollution: गणेशोत्सवात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मंडळांची गय नाही; नियम मोडल्यास थेट गुन्हा!

माउलीनगरला वेगळा न्याय का?

रुंदीकरणाच्या कामासाठी अन्य भागांतील बांधकामे आणि अडथळे हटविण्यात आले आहेत. मग माऊलीनगरमधील कथीत अतिक्रमणांवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या भागात ग्रेड सेपरेटर प्रस्तावित असला, तरी रस्ता खुला करण्यास नेमका कोणता अडथळा आहे, हे प्रशासनाने स्पष्ट करणे गरजेचे आहे. कात्रज चौकात दंडात्मक कारवाईसाठी यंत्रणा तत्पर दिसत असताना धोकादायक यू-टर्नवर वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे वॉर्डन का नाहीत? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थानिक नगरसेवक, आमदार आणि पदाधिकारी या गंभीर प्रश्नावर ठोस भूमिका कधी घेणार, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. फक्‍त घोषणा नकोत; सुरक्षित रस्ता आणि जबाबदार प्रशासन हवे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news