

पुणे: ज्या ‘पंचवटी’ वास्तूत गदिमांच्या अलौकिक प्रतिभेला कोंब फुटले, अनेक पिढ्यांच्या भावविश्वाला त्यांच्या शब्दांनी सजवले अन् सावरलेही अशा गीतरामायणाचे शिल्पकार ग. दि. माडगूळकर ऊर्फ गदिमा यांच्या ‘पंचवटी’ या निवासस्थानावरून माडगूळकर कुटुंबातला अंतर्गत वाद समोर आला आहे.
कुटुंबातील काही व्यक्तींकडून गदिमांची ‘पंचवटी’ ही वास्तू पाडून बिल्डरला विकण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणत गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी सोशल मीडियावर आपल्याच नातेवाइकांवर गंभीर आरोप केले आहेत, तर दुसरीकडे सुमित्र यांच्या आई शीतल श्रीधर माडगूळकर यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देणारे पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यामुळे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गदिमांच्या साहित्याशी निगडित असलेली ‘पंचवटी’ वास्तू जपली जावी, अशी भावना साहित्यवर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
पुणे-मुंबई रस्त्यावरील वाकडेवाडी येथे डाव्या बाजूला गदिमांचा सुंदर, टुमदार पंचवटी हा बंगला आहे. चित्रपट गीते-भावगीते, गीतरामायणासारख्या रामचरित्र वर्णन करणाऱ्या रसाळ रचनांपर्यंतची कामगिरी गदिमांनी या वास्तूतच केली. पण, आता या वास्तूवरून कौटुंबिक वादाला तोंड फुटले आहे. गीतरामायणसारख्या अमर काव्यकृतीची निर्मिती ज्या वास्तूमध्ये झाली, अनेक साहित्यिक मैफली आणि सांस्कृतिक घडामोडी ज्यांनी अनुभवल्या, तीच वास्तू पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा सुमित्र माडगूळकर यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये केला आहे.
काही जवळचे नातेवाईक आर्थिक फायद्यासाठी पंचवटी पाडण्याचा दबाव टाकत असल्याचा आरोप करत त्यांनी हे लोक बाहेर गदिमांचा वारसा जपल्याचे सांगतात. पण, प्रत्यक्षात तेच ही वास्तू पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या वास्तूला वाचवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मला आणि माझ्या पत्नीला बदनाम केले जात असून, आमच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, कितीही बदनामी झाली तरी मी पंचवटी पाडू देणार नाही, कोथरूडमध्ये साकारण्यात येणारे गदिमांचे स्मारक जितके महत्त्वाचे आहे, तितकीच पंचवटीदेखील माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असे त्यांनी पोस्टद्वारे म्हटले आहे. दरम्यान, मुलाच्या आरोपानंतर गदिमांच्या सून आणि सुमित्र यांची आई शीतल श्रीधर माडगूळकर यांनी अत्यंत भावनिक आणि तितकीच आक्रमक पोस्ट लिहून बाजू मांडली आहे.
‘जेव्हा घराला रंग द्यायचा होता किंवा दुरुस्ती करायची होती, तेव्हा तू पैसे दिले नाहीस, उलट विरोध केलास, तेव्हा तुला वाटले नाही का की, आपलेही काही कर्तव्य आहे, पंचवटीचा पुढचा भाग पडायला आला होता. तेव्हा बाबांनी आणि काका आनंद माडगूळकर यांनी तो दुरुस्त केला होता. पंचवटीमधील देखभाल- दुरुस्तीची कामे आम्ही केली, तेव्हा तू कुठे होतास?,’ असे सांगत त्यांनी सुमित्र यांच्यावरच निशाणा साधला आहे. ‘पंचवटीसाठी बिल्डरला बघायला तूच पुढे होतास. खोटे आरोप करणे सोड. आता तुझ्या चुकीच्या वागण्याचे समर्थन पंचवटी पाडण्याच्या पोस्टने केले आहेस. लोकांच्या गदिमांच्या प्रेमाचा, आदराचा गैरफायदा घेण्याचा तुझा प्रयत्न चुकीचा आहे. परंतु, माझ्यावरच आरोप करतोस याला काय म्हणू? परमेश्वर सर्व बघत आहे आणि सत्याचाच विजय होतो, असा माझा विश्वास आहे,’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
या वादात राजकारण आणू नये
कुटुंबातील वादाबाबत, आरोपाबाबत गदिमांचे पुत्र आणि ज्येष्ठ लेखक आनंद माडगूळकर यांनी हा आमचा कौटुंबिक प्रश्न आहे. हा प्रश्न कौटुंबिक मर्यादेतच चर्चा करून सोडविला जाईल. त्याला कृपया कोणीही भडक रंग देऊ नका, त्याच्यात राजकारण आणू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे.