

पौड रोड: बदलत्या हवामानामुळे तापमानात वाढ होत असून, जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. अशा परिस्थितीत वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी वनविभागाने डोंगराळ भागात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. मात्र, या पाणवठ्यांमध्ये पाणीच उपलब्ध नसल्याने ते केवळ शोभेच्या वस्तू ठरत आहेत. निधीअभावी नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
कोथरूड परिसरातील म्हातोबा टेकडी, एआरएआय टेकडी, चतुःशृंगी ते बावधनच्या डोंगराळ भागात वनविभागाने विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या वनक्षेत्रात ससे, हरीण, मोर यांसह विविध प्रकारचे पक्षी आणि अन्य वन्यजीवांचा वावर आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था महत्त्वाची ठरते. मात्र, पाणी भरण्याची नियमित व्यवस्था नसल्याने या पाणवठ्यांचा वन्यजीवांना प्रत्यक्षात उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
कोथरूड परिसरातील म्हातोबा टेकडी, एआरएआय टेकडीसह सर्व्हे क्रमांक १२०/७४ मध्ये सुमारे १२७.९९ हेक्टर वनक्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक ठिकाणी पाणीसाठ्यांसाठी तळी आणि कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मात्र, त्यामध्ये पाणी नसल्याने वन्यजीवांसाठी केलेली व्यवस्था निष्प्रभ ठरत आहे. पाणवठे उभारण्याबरोबरच त्यामध्ये नियमित पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वनविभागाने पार पाडणे गरजेचे आहे.
वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
वनक्षेत्रात पाणवठे असूनही पाणी मिळत नसेल, तर या सुविधांचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वन्यजीवांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन निधीची तरतूद करावी आणि सर्व पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
पाण्याअभावी पक्षी आणि प्राण्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाण्याची व्यवस्था करावी. कृत्रिम पाणवठे तयार करून उपयोग नाही; त्यामध्ये नियमित पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
संजय तोंडे, सामाजिक कार्यकर्ते
आम्ही निधीची मागणी केली आहे. सध्या म्हातोबा टेकडी, हनुमाननगर टेकडी, एआरएआय टेकडी आणि बावधन टेकडी परिसरात आठवड्यातून एकदा टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे.
मनोज भांबोर्डे, वन अधिकारी, वनविभाग, कोथरूड