Shirur Onion Cultivation: पाणीटंचाईच्या धास्तीने कांदा लागवडीची लगबग; विकतच्या रोपांना शेतकऱ्यांची पसंती

अल्प पावसामुळे पाण्याची चिंता; विकतची कांदारोपे घेऊन लागवड लवकर पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांचा भर
Shirur Onion Cultivation
Shirur Onion CultivationPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरखेड: अत्यल्प पाऊस आणि आगामी काळात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन शिरूर तालुक्यातील बेट भागात रब्बी हंगामातील कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे.

पाण्याची उपलब्धता मर्यादित राहण्याची शक्यता असल्याने लागवड लवकर पूर्ण करण्यासाठी शेतकरी नियोजन करीत असून, अनेक जण विकतची कांदारोपे घेऊन लागवड करण्याला प्राधान्य देत आहेत.

यंदा साठवणूक केलेल्या कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील हंगामातील कांद्याने आर्थिकदृष्ट्या साथ दिल्याने कांदा पिकावरील विश्वास अधिक दृढ झाला असून, आगामी रब्बी हंगामात उन्हाळी कांद्याची लागवड करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात तयारी करीत आहेत.

मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विहिरी, कूपनलिका आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या आधारे कांदा पिकाचे नियोजन करावे लागत आहे. पाणी उपलब्ध असतानाच लागवड पूर्ण करून पिकाला सुरुवातीच्या काळात पोषक वातावरण मिळावे, यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

Shirur Onion Cultivation
Bhongawali Substation Project: भोंगवली वीज प्रकल्प होणारच; पोलिसांकडून आंदोलकांना दम

नोव्हेंबर महिन्यात कांदा लागवड केल्यास सध्याच्या थंड व पोषक वातावरणाचा पिकाला फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पुढील काळात पाण्याची कमतरता अधिक तीव्र होण्यापूर्वी पिकाची वाढ चांगली करून उत्पादन मिळविण्याचे नियोजन केले जात आहे.

वेळ वाचविण्यासाठी विकतची रोपे घेऊन लागवड करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. योग्य वयाची व निरोगी रोपे मिळावीत, यासाठी शेतकरी आगाऊ रोपांची व्यवस्था करीत आहेत.

मागील हंगामात कांद्याला मिळालेल्या समाधानकारक दरामुळे आर्थिक गणित काही प्रमाणात सुधारले असून, यंदाही चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, पाणीटंचाई, उत्पादन खर्च आणि भविष्यातील बाजारभाव या आव्हानांची चिंता कायम आहे.

Shirur Onion Cultivation
Indapur Voter List Objections: इंदापूरला मतदार यादीतील बोगसगिरी उघड; मोठा गोंधळ

पाणी उपलब्धतेचे काटेकोर नियोजन

बेट भागातील शेतकरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनासह विविध उपाययोजना राबवत आहेत. कांदा पिकाला आवश्यक त्या टप्प्यावर पाणी देऊन उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच पाण्याची बचत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अत्यल्प पावसाच्या पार्श्वभूमीवर यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र किती वाढते आणि शेतकरी पाणी व्यवस्थापन कसे करतात, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.