

पुणे: श्वानासोबत लैंगिक छेडछाड झाल्याचा व्हिडीओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला. युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटीसंदर्भात समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडीओची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागातील पशुवैद्यकीय विभागाने घेतली आहे.
याप्रकरणी संबंधित संस्थेला नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला असून, संस्थेकडून खुलासा सादर करण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. व्हिडीओ जून महिन्यातील असून, त्या वेळी एक कर्मचारी श्वानाला चुकीच्या पध्दतीने हाताळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
त्यानंतर पुणे पशुवैद्यकीय विभागाकडे ई-मेलद्वारे तक्रार प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेला खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
संस्थेने दिलेल्या खुलाशानुसार, संबंधित कर्मचारी सेवेतून कमी करण्यात आला असून, त्याच्याविरोधात फुरसुंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे. याबाबतची कागदपत्रेही खुलाशासोबत सादर करण्यात आली असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली आहे.
दरम्यान, या खुलाशाच्या आधारे आरोग्य विभागाच्या पशुवैद्यकीय विभागाने पुणे शहराचे पोलिस आयुक्त तसेच फुरसुंगी पोलिस स्टेशन यांना सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याबाबत लेखी कळविले आहे. ही माहिती उपआरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.