Pune Mission Parivartan Cell: नागरी समस्यांवर समन्वयात्मक उपायांसाठी पुणे महापालिकेचे ‘मिशन परिवर्तन’ सेल
पुणे: शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या रस्त्यांची अवस्था, वाहतूक सुरक्षितता, स्वच्छता, अतिक्रमण, पर्यावरण आदी प्रश्नांवर समन्वयाने आणि प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘मिशन परिवर्तन’ सेल सुरू करण्यात येणार आहे. या विशेष सेलमध्ये महापालिका आयुक्तांसह विविध महत्त्वाच्या शासकीय आणि निमशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी असणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नागरी समस्या लक्षात घेता स्वतंत्र आणि समन्वयात्मक यंत्रणेची आवश्यकता होती. याच पार्श्वभूमीवर ’मिशन परिवर्तन’ सेलची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. या सेलच्या माध्यमातून शहरातील सुस्थितीतील व खराब अवस्थेतील रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, अपघातप्रवण ठिकाणे, फुटपाथवरील अतिक्रमणे, सार्वजनिक स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच
प्रदूषणासंबंधीच्या तक्रारींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सेलमध्ये महापालिका आयुक्तांसोबत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, बीएसएनएल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांसारख्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अनेक कामे रखडतात. मात्र, ’मिशन परिवर्तन’ सेलमुळे सर्व संबंधित विभाग एकाच व्यासपीठावर येऊन निर्णय घेतील आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, रस्त्यांवरील चेंबर्स आणि फुटपाथ सुरक्षित राहावेत, अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात तसेच नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, हे या सेलचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची यंत्रणाही या सेलअंतर्गत उभारली जाणार आहे. ‘मिशन परिवर्तन’मुळे केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता ठोस निर्णय, कालबद्ध अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष बदल दिसून येतील, असा विश्वास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला आहे.

