

पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी कपडे, सोने, फटाके, पणत्या, कंदीलसह भेटवस्तू आदींची मनसोक्त खरेदी केली. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच लक्ष्मी रस्त्यापासून ऑनलाईन खरेदीपर्यंत सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. खासगी आस्थापनांसह घरगुती स्वरूपात पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे, या काळात पुण्यातील बाजारपेठांमध्ये जवळपास चार ते पाच हजार कोटींची उलाढाल झाल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात आले. (Latest Pune News)
यंदाच्या दिवाळीत मिठाई, सुकामेवा, दिवाळी किट भेट देण्याकडे नागरिकांचा सर्वाधिक कल आढळून आला असून, यात सुमारे 100 ते 200 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
या किटला राहिली मागणी
अभ्यंग किट - साबण, स्नानगंध, उटणे, लिप बाम, सुगंधी तेल, अत्तर
सुकामेवा किट - अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता, मनुके, सुके अंजीर
मिठाई बॉक्स - पेढा, बर्फी, काजूकतली, हलवा, गुलाबजाम, रसगुल्ले
पुणेकरांकडून या कपड्यांनामिळाली जास्त पसंती
युवतींसह महिला वर्गांकडून आलिया कट कुर्ती, नायरा कट कुर्ती, प्रिन्सेस कट कुर्ती, इंडो वेस्टर्न कुर्ती यांसह कॉटन व रेयॉनस्लिमकधील एथिनिक ड्रेसला अधिक पंसती मिळाली.
आर्गांझा फ्लोरल प्रिंट, सिल्क साडी, रफल साडी, सॉफ्ट सिल्क, बनारसी साडी, स्क्विन साडी, बाटिक प्रिंटेडलाही महिलावर्गांकडून चांगला प्रतिसाद मिळाला
मेन्स कॅटेगरीमध्ये क्रॉस कट कुर्ता, शॉर्ट प्रिंटेड, चिकनकरी, कलामकारी कुर्ता यांसह जीन्स, क्वाड्रा, लेनिन, जॅकेट आदी कपड्यांना अधिक पसंती मिळाली.
सोन्या-चांदीचे कॉईन, बिस्किट अन् मूर्तीच्या व्यवहारातील उलाढाल
(सुमारे दीड ते दोन हजार कोटी)
बोनस देण्यासाठी सराफा बाजारात सोन्या-चांदीचे कॉईन, बिस्किट यांसह लक्ष्मीमूर्तीस विशेष मागणी राहिली. दागिन्यांसह, वेढणी, कॉईन तसेच बिस्किटची आगाऊ नोंदणी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. शहरातील सराफा व्यावसायिकांनी पुणेकरांसाठी विविध ऑफर देऊ केल्या होत्या. यामध्ये, सोने खरेदीवर तेवढीच चांदी फी, लकी ड्रॉ कूपन, मजुरीवर डिस्काऊंट, पैठणी साडी, वेढणीसाठी स्वतंत्र काऊंटर आदी व्यवस्था करण्यात आल्या होत्या. पुणेकरांनी जवळपास पाच ते सात टनांहून अधिक सोने खरेदी केल्याचा अंदाज सराफा बाजारातून व्यक्त करण्यात आला.
चिमुकल्यांसह तरुणाईमध्ये फॅन्सी फटाक्यांची क्रेझ (उलाढाल - 40 ते 50 कोटी)
दिवाळीच्या पाच दिवसांपूर्वीच शहरासह उपनगरांत फटाके विक्रीचे स्टॉल उभारल्याचे दिसून आले. यंदाही पुणेकरांनी फटाक्यांची मनसोक्त खरेदी करत लक्ष्मीपूजनाासह पाडवा व भाऊबीजेदिवशी फटाक्यांची मनसोक्त आतषबाजी केली. मोठ्या आवाजापेक्षा कमी आवाजाचे, प्रदूषण कमी करणाऱ्या चमचमणाऱ्या फटाक्यांना मागणी चांगली राहिली. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांसोबतच मुख्यत: कर्नाटक, केरळ व मध्य प्रदेश या राज्यातून फटाके बाजारात विक्रीसाठी दाखल झाले होते.
पूजनासाठी मध्य प्रदेशातून आल्या लक्ष्मी (उलाढाल - 50 ते 60 लाख)
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे रूप असलेल्या झाडूला अनन्यसाधारण महत्व असते. या दिवशी घराघरांत झाडूला लक्ष्मीच्या स्वरूपात पूजले जाते. फ्लॅट संस्कृतीमुळे बहुतांश घरातून झाडूंचे विविध प्रकार उपलब्ध असले तरी पूजेच्या दिवशी खजूर तसेच शिंदीच्या पानांपासून तयार केलेल्या पारंपरिक लक्ष्मीला पूजन्याची परंपरा आजही कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारात मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दाखल झाल्या होत्या. बाजारात लहान आकाराच्या केरसुणीची 8 ते 10 रुपये, मध्यम 15 ते 28 रुपये, मोठी 30 ते 40 रुपये तर कंगणची 40 ते 50 रुपयांना विक्री होत होती.
बालचमूंसाठी किल्ले अन् मावळ्यांचे आकर्षण
रायगड, राजगड, प्रतापगडासह काल्पनिक किल्ल्यांची चलती यंदा बाजारात दिसून आली. 8 इंचापासून 3 फुटांपर्यंतचे किल्ले घेण्यासाठी बालचमूंचा पालकांकडे आग््राह दिसून येत होता. बाजारात, किल्लासह त्यावर ठेवण्यासाठी लागणारे मावळे, तोफा, प्राणी, पोलिस, सैनिकांसह गवळणींनाही मोठी मागणी राहिली. बाजारात 250 रुपये डझनपासून त्यांची विक्री करण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दिवाळी पहाट अन् दिवाळी अंकांचीही चलती (उलाढाल - 100 ते 150 कोटी)
शहरात ठिकठिकाणी गायकांच्या सुमधूर स्वर अन् कलाविष्कारांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याखेरीज, नामवंत लेखकांच्या लेखातून साकारलेल्या दिवाळी अंकामुळे पुणेकरांची दिवाळी खास राहिली. त्यात काही प्रकाशकांनी ऑडीओ स्वरूपात अंक उपलब्ध करून दिल्याने पुणेकरांठी ही गोष्ट नवीन ठरली.
पाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक व गृहोपयोगी वस्तूंची खरेदी (उलाढाल - 200 ते 300 कोटी)
पाडव्याच्या मुहूर्तावर घरात नवीन फर्निचर, तसेच आवश्यक साहित्य घेण्याकडेही नागरिकांचा कल दिसून आला. त्यामुळे, शहरातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्येही उत्साहाचे वातावरण होते. बाजारात फर्निचरमध्ये लाकडी, लोखंडी कपाटे, शोकेस, सोफासेट, डायनिंग टेबल, आराम खुर्ची, झोपाळे यांसह इलेक्ट्रॉनिक्सच्या साहित्यामध्ये टिव्ही, फिज, वॉशिंग मशीन, घरगुती वापरायच्या वस्तू, आकर्षक झुंबर, विद्युत दिवे खरेदी करण्यास ग््रााहकांनी प्राधान्य दिले. मूळ किंमतीवर 30 ते 40 टक्के सवलतीही उपलब्ध केल्या आहेत.
झेंडू, शेवंती नरमली; चमेली, मोगरा फुलला (उलाढाल - 7 ते 10 कोटी)
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारासह अन्य बाजारांत फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. सणासाठी झेंडूचे विशेष महत्त्व असते. यादिवशी पूजेसह नवीन वाहन तसेच घर खरेदी केल्यानंतर त्याची सजावट तसेच पूजा करताना झेंडू या फुलाचा प्रामुख्याने वापर केला जातो. त्या अनुषंगाने सोलापूर, बारामती तसेच पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून बाजारात आलेल्या कलकत्ता गोंडा, लाल व पिवळ्या रंगाच्या झेंडूसह शेवंतीने बाजार फुलल्याचे चित्र दिसून आले. सणासाठी झेंडूसह शेवंती, बिजली, गुलछडी, ॲष्टर, मोगरा, कागडा या फुलांना मोठी मागणी होती.
कंदील, लक्ष्मीमूर्ती, पणत्यांच्या पूजा साहित्य खरेदीचा थाट (उलाढाल - 80 ते 100 कोटी)
घर असो किंवा दुकान असो किंवा कार्यालय दिवाळीत कंदील, पणती लावून याठिकाणी सजावट करण्यात येते. त्यासाठी कसबा पेठेसह केशवनगरमधील कुंभारवाड्यासह बाजारपेठांमध्ये पणत्या, कंदील खरेदीसाठी गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठे महत्त्व असते. त्यापार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये धनलक्ष्मी रूपातील पारंपरिकसह दाक्षिणात्य शैलीतील मूर्ती अर्ध्या फुटांपासून ते सव्वा फुटांच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत.
मागील दोन हातात पुष्प, तर पुढील एका हाताने आशीर्वाद तर दुसऱ्या हाताने धनवर्षाव करणाऱ्या अत्यंत आकर्षक व सुबक मूर्तीची आकारानुसार 500 ते 2000 रुपयांपर्यंत विक्री होत होती. तसेच, लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या हळद, कुंकू, अगरबत्ती, धूप, कापूर, वस्त्र आदी साहित्यांच्या बाजारातही मोठी उलाढाल झाली.
दिवाळीतील ई-कॉमर्सची उलाढाल
(सुमारे 80 ते 100 कोटी)
पुणेकरांचे आवडते खरेदी ठिकाण असलेला लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, तुळशीबागेत कपडे, दागिने तसेच अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरीकांची झुंबड उडाली होती. मध्यवर्ती भागातील दुकानांसह उपनगरांतील दुकाने ग््रााहकांच्या गर्दीने गजबजून गेले होते. दिवाळीसाठी नवनवीन कपडे खरेदी करण्यासह अन्य साहित्यांच्या खरेदीसाठी नागरीकांनी या रस्त्यावर ऑनलाइन संकेतस्थळावरही झुंबड उडाली होती. दिवाळीच्या अनुषंगाने दुकानदार तसेच ई-कॉमर्स कंपनीकडून खरेदीवर सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. यात कपड्यांपासून पणत्या, ड्रायफुटस्, मोबाईल, फीज, एलईडींवर विशेष सवलती होत्या.
धनत्रयोदशीपासून बाजारात जिल्ह्यासह राज्यभरातून सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढली होती. मागणीच्या तुलनेत आवक खूपच जास्त असल्याने घाऊक बाजारात झेंडू, शेवंतीसह अन्य फुलांच्या दरात मोठी घसरण झाली होती. याकाळात जुई आणि चमेलीचे दर एक हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते.
सागर भोसले, समन्वयक, फुलबाजार अडते असोसिएशन
दिवाळीकाळात सोन्या-चांदीची दर वाढ आणि घटमुळे ग््रााहकांमध्ये कमालीची उत्सुकता जाणवली. यंदाही बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री झाली. लोकांनी आगाऊ बुकिंग करत दागिने खरेदीला प्राधान्य दिले. 70 टक्के नागरिकांकडून दागिन्यांची तर उर्वरित 30 टक्के नागरिकांकडून चोख सोन्याची खरेदी करण्यात आली. मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा ट्रेंड यंदाही कायम दिसून आला. यामध्ये, नागरिकांकडून नाणी, वेढणी, साखळी, मंगळसूत्र तर तरुणाईकडून लाइटवेट दागिने, टेम्पल, पेंडट डिझानच्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली.
जीत मेहता, संचालक, पुष्पम् ज्वेलर्स
जीएसटीत कपात केल्याने यंदा सुकामेव्याचे दर गतवर्षीच्या तुलनेत खूप कमी होते. त्यामुळे, दिवाळीत मिठाईपेक्षा सुकामेवा भेट स्वरूपात देण्याकडे पुणेकरांचा कल यंदा वाढला. कॉर्पोरेट कंपन्यांकडूनही गिफ्टसाठी सुकामेव्याला मोठी पसंती मिळाली.
वीन गोयल, सुकामेव्याचे व्यापारी, मार्केट यार्ड
जीएसटी कमी झाल्याने यंदा सुकामेवा स्वस्त
बाजारात 250 रुपयांपासून पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत गिफ्ट बॉक्स उपलब्ध होते. सुकामेव्यावरील जीएसटी कमी केल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुकामेवा स्वस्त झाला. त्यामुळे, सुकामेव्याचे गिफ्ट बॉक्सही मोठ्या प्रमाणात स्वस्त होते. त्यामुळे ते खरेदी करत भेट देण्यास पुणेकर पसंती देत होते. यामध्ये, खासगी आस्थापनांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे सांगण्यात आले.