

Shirur Pimperkhed three leopards captured
पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (दि. २४) रात्रीत वेगळ्या ठिकाणी तीन बिबटे कैद झाले. शिवन्या बोंबेच्या मृत्यूच्या घटनेनंतर पिंपरखेडमध्ये दहा दिवसांत सहा बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दहा दिवसांत जेरबंद झालेल्या बिबट्यांची संख्या बघता पिंपरखेडमध्ये बिबट्यांची प्रचंड दहशत पाहायला मिळत आहे.
शिवन्या बोंबे या चिमुकलीच्या मृत्यूची घटना घडल्याने पिंपरखेड आणि परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. बिबट्याकडून हल्ल्याचा प्रयत्न होत असल्याने वनविभागाकडून पिंपरखेडमध्ये ७ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. शुक्रवारी (दि. २४) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आंबेवाडी येथील गणेश वसंत बोंबे यांच्या घराजवळील पिंजऱ्यात अंदाजे साडे सहा वर्षांचा नर जातीचा बिबट पिंजऱ्यात कैद झाला. याच वेळी पारगाव रस्त्यालगत माजी ग्रामपंचायत सदस्य नरेश सोनवणे यांच्या घराच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात साडे चार वर्षांची मादी पिंजऱ्यात कैद झाली, तसेच शुक्रवारी रात्रीच दाभाडे मळा ओढ्यालगत लावलेल्या पिंजऱ्यात पाच वर्षाची बिबट मादी जेरबंद झाली.
वनविभागाचे वन कर्मचारी महेंद्र दाते व इतर कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तीनही बिबट्यांना माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केले आहे, अशी माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली. मृत शिवन्या बोंबेच्या घटनास्थळी सलग तीन बिबट जेरबंद झाल्यानंतर एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी तीन बिबटे पिंजऱ्यात अडकले असून दहा दिवसांत सहा बिबटे जेरबंद झाल्याने पिंपरखेड आणि परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे.
पिंपरखेड येथे एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी तीन बिबटे जेरबंद झाल्याने बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. घराबाहेर, घराशेजारील शेतात, रस्त्याने ये-जा करताना बिबट्याचे दर्शन नित्याचेच होत असल्याने या भागात वनविभागाकडून पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.