

पुणे: शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी मॉडेल कॉलनीतील एका व्यक्तीची 31 लाख 74 हजार 726 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार चतुःश्रृंगी पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
सायबर चोरट्यांनी फिर्यादींसोबत संपर्क साधल्यानंतर त्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखविले. त्यासाठी फिर्यादींना एक ॲप डाऊनलोड करून घेण्यास सांगितले. यानंतर फिर्यादींकडून सुरुवातीला काही रक्कम विविध खात्यावर पाठवून घेतली. त्याचा नफादेखील फिर्यादींना मिळत असल्याचे दाखविण्यात आले.
फिर्यादी येथेच फसले अन् सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकले. फिर्यादींनी सायबर चोरट्यांच्या प्रलोभनाला बळी पडून वेळोवेळी 31 लाख 74 हजार रुपये सायबर चोरट्यांच्या हवाली केले. त्या बदल्यात सायबर चोरट्यांनी फिर्यादींच्या खात्यावर केवळ 274 रुपये जमा केले. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे करीत आहेत.