

पुणे: गेमच्या नादात बुडालेल्या मुलाला ऑनलाइन गेमिंग आयडी देतो, असे सांगत साडेतीन लाखांचे दागिने फसवणूक करून घेणाऱ्यासह दागिने खरेदी करणाऱ्या अशा दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Latest Pune News)
मयूर ऊर्फ शशिकांत मुंजाड (वय 21, रा. परभणी) व अपहार केलेले सोन्याचे दागिने घेणारा किशोर डहाळे (22, रा. परभणी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अल्पवयीन मुलाच्या 40 वर्षीय वडिलांनी आरोपीविरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून अल्पवयीन मुलास लक्ष्य केले आणि फसवणूक करून खंडणी मागितल्याचा प्रकार केला. कोरेगाव भीमा या ठिकाणी एका अल्पवयीन मुलाने शाळेतील ऑनलाइन अभ्यास करताना मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्यास सुरुवात केली. ऑनलाइन गेम खेळण्याचा छंद लागल्याने ’फी फायर’ नावाचा गेम खेळण्यासाठी आयडी मिळविण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. या दरम्यानच इन्स्टाग्रामवरून ऑनलाइन ओळख निर्माण झालेल्या परभणी येथील मयूर भिसाड याने ऑनलाइन गेमिंग आयडी देतो, असा बहाणा करून अल्पवयीन मुलाकडून 3.5 लाख रुपयांचे तब्बल पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली.
हा गुन्हा गंभीर असल्याने या गुन्ह्याचा तपास शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांचे नेतृत्वात विशेष तपास पथकाने केला. आरोपी व पीडित मुलाचे मोबाईल सोशल मीडियावरील चॅटिंग, डीजीटल व्यवहारांचा सखोल तपास करून आरोपी मयूर भिसाड व किशोर डहाळे यांना अटक करण्यात आली. डहाळे याने अल्पवयीन मुलाकडून सोन्याचे दागिने घेऊन ये, ते मी विकत घेतो असे सांगून त्याला दागिने चोरण्यास भाग पाडले.