

सुवर्णा चव्हाण
पुणे: गणेशोत्सव जवळ आला की पुण्याच्या वातावरणात घुमणारा ढोल-ताशावादनाचा निनाद शहराच्या सांस्कृतिक परंपरेची चाहूल देतो. सध्या नदीपात्रांसह शहरातील विविध मैदानांवर ढोल-ताशा पथकांच्या सरावाला वेग आला आहे. पथकांमध्ये वाढलेली जेन झींची संख्या हे चित्र सरावाच्या ठिकाणी पाहायला मिळत असून, जेन झींमुळे पथकांच्या वादन सरावाला नवी ऊर्जा मिळाली आहे. सोशल मीडियावरील रील्स आणि व्हिडीओंच्या प्रभावामुळे जेन झी तरुणाई मोठ्या संख्येने ढोल- ताशा पथकांकडे वळली आहे आणि ही पिढी प्रत्यक्षात पथकात सहभागी होऊन पथक संस्कृतीचा एक भाग बनली आहे.
पूर्वी ढोल-ताशा पथकांमध्ये प्रामुख्याने अनुभवी वादकांचे वर्चस्व असायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती बदलली आहे. ढोल-ताशा पथके ही केवळ पारंपरिक वादन करणारी पथके न राहता तरुणाईच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे, शिस्तीचे आणि सांघिकतेचे केंद्र बनली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यू-ट्यूबवरील वादनाचे रील्स, व्हिडीओ आणि श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांतील सादरीकरण पाहून जेन झी पिढीही पथकांकडे वळली आहे.
याचा परिणाम सदस्यनोंदणीवरही दिसून येत असून, यंदा सदस्यनोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पथकांतील एकूण वादकांमध्ये २० ते ३० टक्के प्रमाण जेन झींचेच आहे. विशेष म्हणजे, यावर्षी पथकांची संख्याही वाढली असून, ती १८० च्या आसपास पोहचली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार आणि व्यवसाय करणारी तरुणाई, प्रत्येक जण मोठ्या मेहनतीने वादन सराव करताना दिसत आहे.
सध्या शहरातील नदीपात्र आणि विविध ठिकाणच्या मैदानांमध्ये सराव सुरू आहे. काही पथकांमध्ये १५०, काहींमध्ये २५० तर मोठ्या पथकांमध्ये ५०० हून अधिक वादक सराव करीत आहेत. सरावाच्या प्रत्येक सत्रात उत्साहासह नियोजन आणि शिस्तही पाहायला मिळत आहे. याविषयी महाविद्यालयीन तरुण मानस जाधव म्हणाला की, ढोल-ताशा पथकांत खूप दिवसांपासूनच इच्छा होती. ती आता पूर्ण झाली आहे.
गेल्या काही वर्षांत पथक संस्कृतीकडे वळणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या वाढली आहे. आता पथकांत अगदी २० वर्षांच्या जेन झी तरुणाईचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत आहे. गणेशोत्सवावर आधारित रील्स, व्हिडीओ पाहून अनेक जण पथकांकडे वळले आहेत. यंदा पथकांची संख्या १८० च्या आसपास पोहचली आहे. अनुभवी वादकांसोबत नव्या पिढीचा सहभाग वाढणे, ही समाधानाची बाब आहे.
ॲड. शिरीष थिटे, ढोल-ताशा महासंघ
यंदा सदस्यनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या पथकात अनुभवींसह नवोदित वादकांचीही संख्या मोठी आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील ढोल-ताशावादनाचे रील्स पाहून जेन झी तरुणाईमध्ये पथकांविषयी आकर्षण निर्माण झाले आहे.
ओंकार कुलकर्णी, उपाध्यक्ष, समर्थ प्रतिष्ठान