

पुणे: शहरात यंदा १ जून ते ६ ऑगस्ट या मान्सून हंगामातील ६७ दिवसांत शहरात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे वर्षभराची सरासरी ६ ऑगस्ट रोजीच पार झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा लोहगाव भागात तब्बल ८०० मिलिमीटर इतका झाला. शिवाजीनगरमध्ये गत ११९ वर्षांतील विक्रमी पाऊस जुलैमध्ये नोंदला गेला. शहरात यंदा मान्सून खूप उशिरा २२ जून रोजी दाखल झाला. त्यामुळे सुरुवातीला पावसाची मोठी तूट होती. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार व ऑगस्टमध्ये सुरू असलेल्या सततच्या रिपरिप पावसामुळे संपूर्ण पुणे शहरासह लोहगाव भागात पावसाने विक्रमी उच्चांक गाठला आहे.
लोहगावात इतका पाऊस कसा?
लोहगाव हा पुण्याचा ईशान्य-पूर्व भाग असून, सामान्यतः येथे शहराच्या पश्चिम भागापेक्षा कमी पाऊस होतो. मात्र, ८०० मि.मी.चा टप्पा पार झाला. जुलैच्या उत्तरार्धात अरबी समुद्रातील 'मरीन हीटवेव्ह' आणि बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'मुळे ढगांची घनता प्रचंड वाढली.
लोहगाव, हवेली तालुक्याच्या मोकळ्या पट्ट्यात स्थानिक उष्णतेमुळे ढगांची उंची वाढली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लोहगावात एकाच दिवसात १२९.२ मि.मी. पाऊस पडला.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर (ताम्हिणी, लोणावळा) अडकलेले मान्सूनचे ढग तीव्र पश्चिमी वाऱ्यांमुळे हवेली आणि लोहगावच्या हवाई पट्ट्यापर्यंत ढकलले गेले.
शहराच्या इतर भागांत कुठे किती पाऊस? (मि.मी.)
शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ ५१०, स्वारगेट-पर्वती ५३०, कॅम्प ४८०, लवळे, कोथरूड ५२० ते ५५०, बाणेर, बालेवाडी ४९०, सिंहगड रस्ता, धायरी ५६०, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क ५१०, वडगाव शेरी, चंदननगर ५३५, हडपसर, मगरपट्टा ४३०, चिंचवड, आकुर्डी ५६५, भोसरी, मोशी ४९०, वाकड, हिंजवडी ५१०.
शहराच्या विविध भागांतील पाऊस
(१ जून ते ३ ऑगस्ट २०२६ )
शिवाजीनगर : ६३३.४ मि.मी. (जुलैमध्ये ५०८.९ मि.मी. पाऊस पडून ११९ वर्षांचा विक्रम मोडला. यापूर्वी १९०७ मध्ये ५०८.५ मि.मी. पाऊस झाला होता.)
लोहगाव ८०० मि.मी. (चालू हंगामात शहरातील विमानतळासह लगतच्या भागात नोंदवला गेलेला हा सर्वाधिक पाऊस आहे.)
पाषाण ५२५ मि.मी. (पश्चिम पुण्याच्या या भागात घाटमाथ्याजवळ असल्यामुळे सातत्याने मध्यम ते तीव्र सरी कोसळल्या.)
मगरपट्टा सुमारे ४२० मि.मी. (पुण्याच्या पूर्व भागात आयटी पार्क परिसरात पाऊस समाधानकारक असला तरी मध्य पुण्याच्या तुलनेत काहीसा कमी नोंदला आहे.)
लवळे ५१० मि.मी. (टेकड्यांच्या भागात स्थित असल्यामुळे लवळे परिसराने जुलैमध्ये एकाच दिवसात ५० मि.मी.पेक्षा जास्त पावसाचे टप्पे झाले.)
पुणे शहराच्या 'हवेली तालुक्यात' जुलैच्या शेवटी एकाच दिवसात १८० मि.मी. पावसाची नोंद झाली. ज्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडावे लागले आणि शहरात पूरस्थिती निर्माण झाली.
का झाला शहरात विक्रमी पाऊस?
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची क्षेत्रे वारंवार सक्रिय.
मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा अनेक दिवस मध्य महाराष्ट्रावर स्थिर आहे.
सह्याद्री पर्वतरांगांमुळे पश्चिमेकडून येणारे दमट वारे वर उचलले जाऊन ढगांची निर्मिती वेगाने होत आहे.
पुणे शहरातील वाढते शहरीकरण आणि स्थानिक उष्णतेमुळे दुपारनंतर ढगांची निर्मिती वेगाने होऊन पूर्वेकडील भागांत अधिक पाऊस पडला.
जुलैच्या उत्तरार्धात अरबी समुद्राचे पृष्ठभागीय तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याने वातावरणात अधिक बाष्प उपलब्ध झाले.
यंदा देशात सरासरीच्या ९० ते ९४ टक्के पाऊस पडणार, हा अंदाज आम्ही दिला होता. मात्र, काही भागात जास्त म्हणजे १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. हा अंदाज देण्यात आमचे मॉडेल कमी पडले. महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. कारण, जुलैमध्ये सर्वाधिक कमी दाबाचे पट्टे याच भागात तयार झाले. त्याचा परिणाम म्हणून त्या भागात पाऊस वाढला.
डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, आयएमडी, दिल्ली