Pune Crime News : घरात घुसून गोळ्या झाडणारा नवनाथ उर्फ नब्या जेरबंद, शस्त्रसाठाही जप्त

Pune Crime News : घरात घुसून गोळ्या झाडणारा नवनाथ उर्फ नब्या जेरबंद, शस्त्रसाठाही जप्त

पुणेः पुढारी वृत्तसेवा : पहाटेच्यावेळी घरात घुसून गावठी पिस्तूलातून गोळी झाडून खून करणार्‍या सराईताला खडक पोलिसांनी अटक केली आहे. किरकोळ वाद आणि पाच हजार रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणातून त्याने हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.नवनाथ उर्फ नब्या सुरेश लोधा (वय.37,रा.घोरपडे पेठ, कृष्णा हाईटस् तिसरा मजला) असे त्याचे नाव आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेले एक गावठी पिस्तूल, आणि त्याच्या साथीदाराकडून दोन अशी तीन पिस्तूले पोलिसांनी जप्त केली आहेत.

तर अनिल रामदेव साहू (वय 35) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी, खडक पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे.दरम्यान यापुर्वी गुन्हे शाखा युुनिट एकच्या पथकाने त्याचे साथीदार रोहित संपत कोमकर (वय 33,रा. गुरुवार पेठ), गणेश उल्हासराव शिंदे (वय 41,रा. चव्हाणनगर, धनकवडी), अमन दीपक परदेशी (वय 29,रा.घोरपडे पेठ) या तिघांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.30) पहाटे दोनच्या सुमारास घोरपडेपेठ येथील श्रीकृष्ण हाईट्स श्रीमंत सुवर्णभारत मित्रमंडळाजवळ घडली.

मध्यवस्तीत झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. खून केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता. तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच दिवशी लोधा याच्या तिघा साथीदारांना पकडले होते. मात्र लोधा पसार झाला होता. खडक पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. त्यावेळी मुख्य आरोपी लोधा हा खेड शिवापुर येथे थांबला असल्याची माहिती पोलिस अमंलदार हर्षल दुडम आणि आशिष चव्हाण या दोघांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून लोधा याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खूनाची कबुली दिली आहे. लोधा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापुर्वी देखील खडक, मुंढवा आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यात घातक शस्त्र बाळगणे , खूनाचा प्रयत्न, बिस्तूल बाळगणे,जाळपोळ असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने, संपत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राकेश जाधव,उपनिरीक्षक अजिज बेग, कर्मचारी संदिप तळेकर, सागर घाडगे, लखन ढावरे,मंगेश गायकवाड, प्रमोद भोसले, रफिक नदाफ यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news