

पलूस : जिल्ह्यातील सर्वांत मोठी कुंडल ग्रामपंचायत व गेल्या चाळीस वर्षात विठ्ठलवाडी आणि आमणापूरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडल ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता काबीज केली आहे, तर आमणापूर, राडेवाडी, विठ्ठलवाडी येथे राष्ट्रवादी व भाजपने मारलेल्या मुसंडीने काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. कुंडल गावात आमदार अरुण लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र
लाड, दीपक लाड व भाजप अशी प्रथमच चौरंगी लढत पाहायला मिळाली. सरपंच उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने काँग्रेसकडून अविनाश काळीबाग, राष्ट्रवादीकडून जयराज होवाळ यांच्यात काट्याची लढत झाली. अखेर होवाळ यांचा 772 मतांनी विजय झाला.
कुंडल ग्रामपंचायतीसाठी 17 सदस्य व सरपंच अशी निवडणूक होती. निवडणुकीत अचूक प्रचार रणनीती आखत आमदार लाड यांनी काँग्रेसला धूळ चारत मोठा विजय मिळविला. 17 पैकी 14 जागा व सरपंचपदाचा उमेदवार विजय मिळवून राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली.
आमणापूर ग्रामपंचायतीच्या गत निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व कायम होते. मात्र या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी यांची युती भक्कम झाल्याने काँग्रेसच्या मनसुब्यांना सुरुंग लागला. नाराज, फुटीर, विरोधकांना बाहेरून मिळणारे पाठबळ यामुळे या निवडणुकीत काँग्रेस सत्तेतून बाहेर पडली.
पलूस पंचायत समितीचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते आर. एम. पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. राम उगळे, राष्ट्रवादीचे 'क्रांती'चे संचालक एन. एस. पाटील या नेत्यांच्या पश्चात पहिलीच निवडणूक झाली. यामध्ये आर. एम. पाटील यांचे वारसदार आकाराम पाटील यांना या निवडणुकीत गावाने साथ दिल्याचे पाहायला मिळाले.
गत निवडणुकीत आ. डॉ. विश्वजित कदम, महेंद्र लाड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसप्रणित प्रा. रामभाऊ उगळे पॅनेलने 13 पैकी 11 सदस्य व थेट जनतेतून सरपंच पदासह सत्ता पुन्हा काबीज केली होती. यावेळी मात्र भाजप-राष्ट्रवादी युतीचा 13 पैकी 9 जागा व सरपंच उमेदवार विजयी झाला. काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.
गावाच्या विकासासाठी प्रयत्न
राष्ट्रवादीमुळे मोठी राजकीय ताकत मिळाली आहे. या ताकतीचा वापर सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठी करणार आहे. जी. डी. बापू लाड यांनी दिलेला स्वच्छतेचा आदर्श या तालुक्यातील गावात राबविला जाणार आहे. स्वच्छतेमुळेच कुंडलला देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला होता. भविष्यात या गावांना स्वच्छ पाणी व गावाचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
– आमदार अरुणअण्णा लाडमतदारांचा कौल मान्य
या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. जय-पराजय हा होतच असतो. कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. भविष्यात अजून ताकतीने तालुक्यासाठी व कुंडल गावासाठी काम करणार आहे. सत्ता असो अथवा नसो, विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. – महेंद्र लाड