सांगली : गॅस वितरण कंपनीला 64 लाखांचा गंडा | पुढारी

सांगली : गॅस वितरण कंपनीला 64 लाखांचा गंडा

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : येथील ओम गुरूदेव इण्डेन गॅस वितरण कंपनीमध्ये ऑनलाईन रकमा जमा केल्याचे दाखवून कंपनीच्या संगणक ऑपरेटरनेच कंपनीला 64 लाख 33 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी संगणक ऑपरेटर सागर आनंदा तेवरे (वय 38, रा. शिक्षक कॉलनी, टकलाईनगर, इस्लामपूर) या संशयिताविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा फसवणुकीचा प्रकार 1 एप्रिल 2021 ते 4 एप्रिल 2023 या कालावधीत घडला. कंपनीच्या लेखापरीक्षण अहवालानंतर हा प्रकार समोर आला. कंपनीचे व्यवस्थापक भरत जाधव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

ओम गुरुदेव इंण्डेन गॅस वितरण एजन्सी ही वाळवा तालुका शेतकरी सहकारी फळ, भाजीपाला खरेदी विक्री व प्रक्रिया संस्था लिमिटेड, इस्लामपूर यांच्या अखत्यारित काम करते. कंपनीमध्ये व्यवस्थापक, कॅशिअर, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ऑपरेटर, डिलिव्हरी बॉय आदींसह 24 कर्मचारी कामाला आहेत. संशयित सागर हा तेथे कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कामाला होता. 2019 पासून इंण्डेन ऑईल कंपनीने कॅशलेस व्यवहार सुरू केले. ऑनलाईन बुकिंगची रक्कमही इंण्डेन ऑईलकडे ओम गुरुदेव इण्डेन गॅस एजन्सी नावाने असणार्‍या खात्यावर, तर गॅस एजन्सीकडील क्युआर कोड व रोख स्वरूपातील रक्कम ही गॅस एजन्सीच्या खात्यात वर्ग केली जाते.

पैसे ठेवू लागला स्वत:कडे…

डिलिव्हरी बॉयला काही ग्राहक रोख पैसे देत होते. डिलिव्हरी बॉय जमा झालेले पैसे सागर याच्याकडे जमा करीत. सागर ते पैसे कंपनीच्या खात्यावर भरत होता. सन 2021 पासून ऑपरेटर सागर याने ग्राहकांचे रोख पैसे डिलिव्हरी बॉय यांच्याकडून घेतले होते. सागरने ग्राहकांचे बुकिंग ऑनलाईन क्यूआरकोड स्कॅन करुन कन्फर्म केले. पैसे कंपनीच्या खात्यावर जमा न करता संशयित सागर याने स्वतःकडे ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लेखापरीक्षण अहवालाने घोटाळा उघडकीस…

गॅस वितरण कंपनीचे व्यवस्थापक जाधव यांनी ग्राहकांच्या गॅस वितरण अहवालासाठी सागर याच्याकडे वारंवार विचारणा केली. मात्र तो अहवाल देण्यास टाळाटाळ करत होता. सन 2021-2022, 2022-2023 मध्ये लेखापरीक्षण अहवालात ऑनलाईन रकमेच्या व्यवहारामध्ये सुमारे 64 लाख 33 हजार रुपयांची तफावत आढळल्याने खळबळ उडाली.

सॉफ्टवेअरचा तज्ज्ञ बनला अन् गंडा घातला…

एजन्सीत नवीन सॉफ्टवेअर सुरू केले. त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर सागर तेवरे यास पाठविण्यात आले होते. प्रशिक्षणानंतर सागर याच्याकडे गॅस एजन्सीचे सर्व संगणकसंबंधित काम पाहणे, कॅशलेस व्यवहार पाहणे व त्यासाठी कंपनीचे मोबाईलवर आवश्यक असणारे अ‍ॅपचे पासवर्ड त्याच्याकडे देण्यात आले होते. तसेच इंडियन ऑईल कंपनीमार्फत सागर तेवरे याचे वेळोवेळी ऑनलाईन व सॉफ्टवेअरसंबंधी प्रशिक्षण झालेले आहे. त्यातील मिळालेल्या ज्ञानाचा व अधिकाराचा गैरवापर करून त्याने कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

Back to top button