

पुणे : पुढारी वृत्तसेवा :
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी खासदार किरीट सोमय्या पुणे महापालिकेत आल्यानंतर बेकायदा जमाव करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीश मुळीक, बापू मानकर, राजेश येनपुरे, दीपक पोटे, धनंजय जाधव, दत्ता खाडे, गणेश घोष, प्रतीक देसरडा यांच्यासह सुमारे 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी फिर्याद दिली आहे.
सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना ११ फेब्रुवारी रोजी भाजप पदाधिकार्यांनी बोलविले होते. तसेच, त्यांच्यावर हल्ला झालेल्या पायर्यांवर त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. शुक्रवारी दुपारी सोमय्या हे महापालिकेत आल्यानंतर भाजपचे शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बेकायदा जमाव करून घोषणाबाजी केली. तसेच, महापालिकेत प्रवेश करताना पोलिसांनी त्यांना बेकायदा जमाव असून प्रवेश करता येणार नसल्याचे सांगितले. त्यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तेथून निघून न जाता त्या ठिकाणी थांबून घोषणाबाजी करत होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलं का