पुणे : डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा : आदित्य ठाकरे | पुढारी

पुणे : डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा : आदित्य ठाकरे

पुणे, पुढारी वृत्तसेवा : डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. येरवडा येथील सलीम अली पक्षी अभयारण्यास भेटी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार चेतन तुपे, माजी मंत्री सचिन अहिर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अतिरिक्त मनपा आयुक्त राहुल खेमणार आदी उपस्थित होते.

आदित्‍य ठाकरे म्हणाले, “गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासन वन वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यंत करीत आहेत. पक्षी आणि वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळणे गरजेचे आहे. पक्षी अभयारण्य परिसरात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, संरक्षणाच्यादृष्टीने परिसरात पोलीसाची गस्त वाढविण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. गैरप्रकार होऊ नये म्हणून सीसीटीव्ही बसविण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत”.

अभयारण्य परिसरात पुणे महानगरपालिकेने स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबवावी. नागरिकांनी या पक्षी अभयारण्याला भेट द्यावी आणि पर्यावरणाच्यादृष्टीने पुण्यातील हिरवे आच्छादन टिकवण्यासाठी झाडाची लागवड करावी, असे आवाहन मंत्री ठाकरे यांनी केले.

पुण्यातील नागरिक पर्यावरणाप्रती जागरुक असून त्यांच्या सहकार्याने पुण्याला २०३० पर्यंत कार्बन न्यूट्रल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी पुण्यात अभयारण्य परिसरात होत असलेल्या कामांची माहिती दिली.

हेही वाचलं का ?

Back to top button