बीड : सह्याद्री देवराईला आग लागली की लावली : सयाजी शिंदे यांचा सवाल | पुढारी

बीड : सह्याद्री देवराईला आग लागली की लावली : सयाजी शिंदे यांचा सवाल

बीड, पुढारी वृत्तसेवा : जगातील पहिले वृक्ष संमेलन झालेल्या बीड सह्याद्री देवराईला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत हजारो झाडे जळाली आहेत. सिनेअभीनेते सयाजी शिंदे यांची ही संकल्पना असून मोठ्या परिश्रमातून ही देवराई उभी राहिलेली होती. तसेच आता ती पर्यटन स्थळ बनली होती. आगीत झाडे जळाल्याची माहिती मिळाल्‍यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांच्‍यासह वृक्षमित्रांनी हळहळ व्यक्‍त केली. ही आग लागली की, कोणी लावली? असा सवाल करत  याचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी सयाजी शिंदे यांनी केली आहे.

बीडपासून जवळच असलेल्या पालवन येथे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून सह्याद्री देवराई उभारण्यात आली आहे. निसर्गाचे देणे लाभलेली ही सह्याद्री देवराई बीडकरांसाठी पर्यटनस्थळ बनली आहे. शनिवारी दुपारी सह्याद्री देवराईला अचानक आग लागली. या आगीत दोन ते अडीच एकर क्षेत्रावरील लिंब, वड, पिंपळ अशी पाचशेहून अधिक झाडे जळाली. आगीची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी आग विझवण्याचा प्रयत्नातून आग आटोक्यात आणली.

 सह्याद्री देवराईत १४ फेब्रुवारी २०२० मध्ये जगातील पहिले वृक्ष संमेलन घेण्यात आले होते. येथील देखण्या निसर्गसंपन्न वातावणामुळे ही देवराई बीडकरांसाठी पर्यटनस्थळ बनली होती. येथे लागलेल्या आगीत शेकडो झाडे जळाल्याचे कळल्यानंतर सयाजी शिंदे व वृक्षमित्रांनी हळहळ व्यक्त केली. मानवी चुकांमुळे आग लागली असेल तर सबंधितांना शिक्षा व्हावी, अशी मागणी वृक्षमित्रांनी केली आहे.

आग कशी लागली याचा तपास करावा : सयाजी शिंदे

सयाजी शिंदे यांना माहिती मिळताच तात्‍काळ त्‍यांनी बीड येथील वृक्षमित्रांना फोन करून याबाबत चौकशी केली. दरम्यान दै. ‘पुढारी’शी बोलताना ते म्‍हणाले, आगीची ही घटना दुर्दैवी आहे. आणि ही आग कशी लागली? का कोणी लावली याचा तपास वन विभाग आणि पोलिसांनी लवकरात लवकर करावा, अशी अपेक्षा सयाजी शिंदे यांनी व्‍यक्‍त केली.

वन विभागाकडून तपास सुरू

आगीची घटना घडली तेव्हा देवराईतील वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीची घटना मानवनिर्मित असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. यामध्ये एका अज्ञातावर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. तसेच सबंधितांचा शोध घेतला जात आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी देवराईत सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button