

पुणे : शहरात नव्याने आणखी पाच पोलिस ठाण्यांना, दोन नवीन परिमंडळांना (सहा आणि सात) वित्त व गृह विभागाने मंजुरी दिल्यानंतर आता शासन निर्णयाद्वारेही अखेर मंजुरी मिळाली आहे. याबरोबर तीन उपायुक्त आणि सहा सहायक पोलिस आयुक्त यांच्या पदांना देखील दि. 14 डिसेंबर 2025 च्या शासननिर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.
लोहगाव, लक्ष्मीनगर, नर्हे, येवलेवाडी, मांजरी या पोलिस ठाण्यांना तर तर शहरासाठी परिमंडळ (झोन) 6 आणि परिमंडळ 7 यांना देखील मंजुरी मिळाली आहे. त्याबरोबरच 830 अधिकचे मनुष्यबळ मंजुर करण्यात आले आहे.
विमानतळ पोलिस ठाण्यातून लोहगाव पोलिस ठाणे, येरवडा पोलिस ठाण्यातून लक्ष्मीनगर पोलिस ठाणे, सिंहगडरोड पोलिस ठाण्यातून नर्हे पोलिस ठाणे, कोंढवा आणि भारती विद्यापीठमधून येवलेवाडी पोलिस ठाणे, हडपसर पोलिस ठाण्यातून मांजरी पोलिस ठाणे यांना मंजुरी मिळाली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त व गृहविभागाला नवीन पोलिस ठाण्यांचा, मनुष्य बळाचा, दोन नवीन झोनचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या पुणे शहरातील गुन्हेगारीचा लेखा जोखा मांडताना पुण्यात आणखी पोलिस ठाण्यांची आवश्यकता का आहे हे नमूद करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता ही पाच पोलिस ठाणे शहरात होणार आहेत. त्यावर शासननिर्णयाद्वारे शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यासाठी निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे.
सध्याच्या पाच परिमंडळांची पुनर्रचना करून नव्याने दोन परिमंडळांची निर्मीती करण्यात आली आहे. सहा आणि सात या परिमंडळासाठी 2 कोटी 36 लाख 48 हजार रूपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत पाच पोलिस ठाणी व दोन परिमंडळ निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा व इतर वरीष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनात लवकरच ही पोलिस ठाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही पोलिस ठाणी, झोन मंजुरी बाबत सहायक पोलिस आयुक्त विवेक पवार यांनी वारंवार शासकीय स्तरावर पाठपुरावा केला.
परिमंडळ 1- खडक, फरासखाना, समर्थ, विश्रामबाग, शिवाजीनगर, डेक्कन
परिमंडळ 2- स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, भारती विद्यापीठ, आंबेगाव
परिमंडळ 3- कोथरूड, वारजे माळवाडी, अलंकार, उत्तमनगर, नांदेडसिटी, सिंहगडरोड, नऱ्हे
परिमंडळ 4- बाणेर, चतुःश्रृंगी, खडकी, विश्रांतवाडी, येरवडा, लक्ष्मीनगर
परिमंडळ 5- येवलेवाडी, कोंढवा, वानवडी, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, लष्कर
परिमंळड 6- मुढवा, हडपसर, काळेपडळ, फुरसुंगी, मांजरी, लोणी काळभोर
परिमंडह 7- लोणीकंद, वाघोली, लोहगाव, विमानतळ, खराडी, चंदननगर
शहरातील पोलिस ठाण्यांसाठी 830 पदांची मंजुरी देताना त्यासाठी 67 कोटी 41 लाख 67 हजार 280 रूपयांचा निधीची तरतूद करण्यात आला आहे.
तीन पोलिस उपायुक्त व सहा सहायक पोलिस आयुक्त
शहरात आता तीन पोलिस उपायुक्त आणि सहा सहायक पोलिस आयुक्त पदांना मंजरु देण्यात आली आहे. त्यासाठी 1 कोटी 93 लाख 46 हजारांची निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यापूर्वी शहरात सात पोलिस ठाणी कार्यान्वीत करण्यात आली आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता आणखी पाच पोलिस ठाण्यांची, झोनची तसेच मनुष्य बळाची गरज यापूर्वी प्रस्तावात नमूद करण्यात आली होती. त्यानुसार शासन निर्णयाद्वाने पाच पोलिस ठाणी, दोन परिमंडह आणि मनुष्य बळाला मंजुरी दिली आहे. लवकरच ही नवीन पोलिस ठाणी कार्यान्वित करण्यात येतील.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे