

मंचर : खेड, आंबेगाव व जुन्नर मार्गे जाणाऱ्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग बदलल्यास उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हा रेल्वे मार्ग पूर्वी ठरविलेल्या मार्गानेच झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ताकदीनिशी लढा द्यावा लागेल, असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
सध्या पुणे-नाशिक रेल्वे अहिल्यानगरमार्गे नेण्याचा विचार सुरू असल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव व जुन्नर तालुके विकासापासून वंचित राहण्याची भीती आहे. याआधी झालेल्या सर्वेक्षणानुसार हा रेल्वे मार्ग या तिन्ही तालुक्यांतूनच जाणे अपेक्षित होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या विषयावर निर्णायक भूमिका ठरविण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सरपंच, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, सर्वपक्षीय कार्यकर्ते व विविध संघटनांची संयुक्त बैठक रविवारी (दि. १४) मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार सभागृहात पार पडली. बैठकीला शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, नीलेश थोरात, सागर काजळे, विष्णूकाका हिंगे, संजय गवारी, डॉ. ताराचंद कराळे, नवनाथ हुले, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, अरविंद वळसे पाटील, सुनील बाणखेले, अशोकराव बाजारे, रामशेठ तोडकर, सुरेशराव घुले, जगदीश अभंग, अंकुश लांडे, गोकुळ भालेराव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, प्रस्तावित मार्ग बदलल्यास या तिन्ही तालुक्यांचे आर्थिक, औद्योगिक व सामाजिक नुकसान होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तसेच रेल्वेमंत्र्यांशी बैठक घेऊन हा मार्ग या भागातूनच कसा फायदेशीर आहे, हे पटवून देण्यात येईल, त्यानंतर पुढील भूमिका ठरविण्यात येईल. या वेळी सचिन बांगर, रवींद्र करंजखेले इत्यादींची भाषणे झाली. जयसिंग एरंडे यांनी आभार मानले.
छायाचित्र ओळ : --------------------------
मंचर येथे झालेल्या रेल्वे मार्गाबाबतच्या बैठकीत बोलताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.