

पुणे : बावधन भागातील राजेश शिंदे यांच्या घराजवळ गुरुवारी सायंकाळी गवा आल्याची चर्चा पसरली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र तो गवा आहे की गव्यासारखा दिसणारा मोठा बैल किंवा गाय आहे, याबाबत संभम निर्माण झाला होता. विभागीय वन्यजीव प्रमुख आशिष ठाकरे यांनी शोध घेऊन तो खरेच गवा आहे की नाही, हे तपासा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या प्राण्याचा तपास वन अधिकाऱ्यांना लागलेला नव्हता.
तीन वर्षांच्या खंडानंतर गव्याची चर्चा...
शहरात सन 2021 आणि 2022 मध्ये दोनवेळा गवा आला होता. 2021 मध्ये महात्मा सोसायटीत तो आला होता. मात्र, तेथे त्याला पकडताना फास आवळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर 2022 मध्ये हिवाळ्यात पुणे-बेंगरुळू महामार्गावर एका नाल्यात गवा दिसला. त्याला जिवंत पकडण्यात वन विभागाला यश आले होते. गवा हा शेल्ड्यूल वन म्हणजे अतिसंरक्षित गटात येत असल्याने तो प्रकट झाला की शहरात वन अधिकाऱ्यांची धावपळ होते.
आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहोत. त्याबाबत माझ्याकडे सध्या काहीच माहिती नाही. तो नक्की गवा आहे की नाही, हे प्रत्यक्ष पाहिल्यावर सांगता येईल.
विशाल चव्हाण, वन अधिकारी
मला ही माहिती तुमच्याकडूनच समजली आहे. घटनास्थळी जाऊन आम्ही आता तपासणी करणार आहोत. एनडीएच्या जंगलात गवे आहेतच. मात्र, ते बाहेर आलेले नाहीत. सध्या एआयमुळे बिबट्यापाठोपाठ आता गव्याची चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्ष दिसल्यावर आम्ही त्यांची खात्रीलायक माहिती देऊ शकू.
नंदकुमार शेलार, वनपरिक्षेत्र अधिकारी, बावधन
वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या शूटमधील प्राण्यात गवा असल्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पायावर पांढरे मोजे दिसत नाहीत, जे खऱ्या गव्याच्या पायावर असतात. हम्पहेड म्हणजे गव्याच्या पाठीवर खूप मोठा उंचवटा असतो, तो देखील यात दिसत नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी हा गवा वाटत नाही, तरी आम्ही तपास करून खात्री करणार आहोत.
बावधन भागातील नागरिकांनी गुरुवारी रात्री 7 च्या सुमारास गवा आल्याचे सीसीटीव्ही फुजेट टाकले. मात्र, त्या प्राण्यात गव्याच्या कोणत्याही खुणा दिसल्या नाहीत. त्यामुळे विभागीय वन्यजीव प्रमुख आशिष ठाकरे यांनी तो गवा, बैल की गाय आहे, हे तपासण्याचे आदेश त्यांच्या अधिकाऱ्यांना दिले.