

पुणे: डिजिटल आणि संगणकीय युगात पुस्तकांपासून दुरावत चाललेल्या वाचकांसाठी पुणे पुस्तक महोत्सव एक नव्या आशेचा किरण ठरत आहे. डिजिटल युगातही वाचन संस्कृती वाढत चालली आहे. पूर्वी दिल्लीचा पुस्तक महोत्सव देशात श्रेष्ठ मानला जायचा, परंतु पुणेकरांनी या महोत्सवात दाखवलेला अभूतपूर्व सहभाग पाहता, हा महोत्सव त्याहून मोठा मानला जाईल, असा विश्वास ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
पुणे पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, प्र- कुलगुरू पराग काळकर, आनंद काटीकर, सोमनाथ पाटील, आबा रावत आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘ग्रंथ रथ’ उपक्रमाद्वारे पुस्तके थेट घराघरांपर्यंत पोहोचवली जात असून, शहरातील नागरिक याला आपला स्वतःचा उत्सव मानत आहेत. पूर्वी रेल्वेतही ग्रंथालये असायची, तीच वाचनाची परंपरा आता पुण्यात पुन्हा नव्याने पुनरुजीवित होत आहे.
तंत्रज्ञानाचे युग कितीही प्रगत झाले तरी ज्ञानासाठी पुस्तकाला पर्याय नाही, हे पुणेकरांनी सिद्ध केले असून, हा महोत्सव गणेशोत्सवाप्रमाणेच पुण्याचा एक ऐतिहासिक लोकोत्सव बनेल, असा विश्वास निर्माण झाला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पांडे यांनी केले, तर आनंद काटीकर यांनी आभार मानले.
चार वर्षांत वेगवेगळे विक्रम प्रस्थापित
पुणे पुस्तक महोत्सवाने गेल्या चार वर्षांत वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केले आहेत. या महोत्सवामुळे पुण्याची ओळख पुस्तकांचे आणि वाचनाचे शहर अशी झाली आहे. डिजिटल युगात पुन्हा पुस्तकांकडे वाचक वळत आहेत, ही आनंदाची बाब असून, वाचनसंस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे काम महोत्सवातून होत असल्याचे डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.