

पुणे: पुस्तकांच्या दुनियेत रमलेली लहान मुले...उत्साहाने विमानांचे विज्ञान समजून घेणारी मुले अन् पालक अन् खाऊगल्लीत विविध खाद्यपदार्थांवर ताव मारणारी मुले...असे उत्साही वातावरण रविवारी(दि. 3) पुणे बाल पुस्तक जत्रेत पाहायला मिळाले.
जत्रेत ‘सलाम भारतीय वायूसेनेला’ या कार्यक्रमाला पालकांसह मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर कथा-कवितांसह राज्यात या कार्यक्रमातून मुलांना कथा-कवितांचे जग जाणून घेता आले. सोमवारी (दि. 4) जत्रेचा समारोप होणार आहे. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, समर्थ युवा फाउंडेशन आणि संवाद पुणेच्या वतीने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे जत्रेचे आयोजन कले आहे. या जत्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रविवारी सकाळच्या सत्रात बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांचा ‘कथा कवितांच्या राज्यात’ हा कार्यक्रम झाला. आव्हाड यांनी मुले आणि पालकांशी संवाद साधत कथा-कवितांच्या राज्याची मनोरंजक सफर घडवून आणली. दुपारच्या सत्रात हवेत उडणाऱ्या विमानांमागील विज्ञान समजून घेण्याची संधी मुले आणि पालकांना ‘सलाम भारतीय वायुसेनेला’ या कार्यक्रमातून मिळाली.
सदानंद काळे यांनी या कार्यक्रमात अत्यंत रंजक पद्धतीने विमानांचे विज्ञान उलगडले. तसेच, विविध लढाऊ विमानांची माहिती सांगितली. विमान तयार करण्याची प्रात्यक्षिकेही दाखवली. पुस्तकांची दालनेही पालक-मुलांनी गजबजली.
जत्रेचा आज समारोप
जत्रेचा सोमवारी (दि. 4 मे) सायंकाळी समारोप करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजता ‘स्क्रीन टाइम कसा, कुठे आणि किती?’ या सत्रात डॉ. श्रुती पानसे, स्मिता पाटील- वळसंगकर सहभागी होणार आहेत. त्यानंतर मोहिनी भुसे आणि सहकारी संबळ वादन, गोंधळ आणि गाण्यांचा कार्यक्रम सादर होईल, समारोपानंतर ‘बाल गीत रामायण’ कार्यक्रम होईल.