

पुणे: सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील ‘मॉन्टेरोजा’ या निवासी गृह प्रकल्पातील अनेक कामे अपूर्ण आहेत, तरीही महापालिकेकडून कामे पूर्ण झाल्याचे दाखवून भोगवटा पत्र दिले गेले असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी करून काहीच कार्यवाही होत नसून, त्यामुळे येथील रहिवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
मॉन्टेरोजा गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांनी याबाबत नुकतीच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार केली आहे. रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मजली टॉवर असलेल्या या प्रकल्पात टेरेसवरील सुविधा, पार्किंग, लिफ्ट यांसारख्या अनेक महत्त्वाच्या सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
तरीदेखील 24 जानेवारी 2022 रोजी महापालिकेकडून या गृह प्रकल्पाला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करून ताबा देण्याचे आश्वासन देत विकसकांनी 100 टक्के रक्कम घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात काम अपूर्णच राहिले आहे.