

पुणे: नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात देखील अशाच एका भोंदूबाबाचे कांड समोर आले आहे. ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून एका उच्चशिक्षित तरुणीचा त्याने तब्बल १७ वर्षे शारीरिक, मानसिक छळ करून तिच्यावर बलात्कार केला. तिला आमानुष मारहाण करीत आपले मूत्र पिण्यास भाग पाडून विजेचे शॉक दिले. तसेच, तरुणीला नवऱ्यापासून घटस्फोट घेण्यास लावून तिची मालमत्ता आपल्या नावावर लिहून घेतली. या भोंदूने तरुणीच्या कुटुंबीयांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तिला त्यांच्याच नजरेत खोटे ठरवले.
अखेर या भोंदूच्या अत्याचाराला बळी पडलेल्या तरुणीने धाडस करून एके दिवशी थेट आपले घर गाठले. तिने या बाबाची कुंडली जेव्हा घरच्यांना दाखवली तेव्हा त्यांच्या अंधश्रद्धेचा बुरखा टराटरा फाटला. शेवटी त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. बुधवारी पहाटे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचा दोनशेपेक्षा अधिक फौजफाटा खराडी उबाळेनगर येथील भोंदूच्या आश्रमात दाखल झाला. राधामोहन मिश्रा (वय ५९) असे या नराधम भोंदूबाबाचे नाव आहे, तर त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन (वय ५७, दोघे रा. माऊली सदन, रेणुका पार्क, उबाळेनगर, खराडी) याच्यासह सहा महिलांना खराडी पोलिसांनी अटक केली आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पोलिस आश्रमाची झडती घेत होते. बाबाने आपल्याला कोणी पकडायला आले, तर पळ काढता यावा, म्हणून एक सुरुंग देखील तयार करण्याची योजना आखली होती. तसे कामसुद्धा तेथे सुरू होते.
याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, खराडी पोलिसांनी लैंगिक अत्याचार, गुन्हेगारी कट रचणे तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २००९ ते २०२६ दरम्यानच्या कालावधीत हरियाणा आणि पुणे परिसरात घडला आहे. आरोपींना न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी उच्चशिक्षित असून, पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिचे वडील डॉक्टर आहेत. हे सर्व मूळचे हरियाणा येथील राहणारे आहेत. स्वामी कंवल नयन याच्या आश्रमात तरुणीचे वडील गेले होते. याच कंवलच्या माध्यमातून तरुणीच्या कुटुंबीयांचा भोंदू राधामोहन मिश्रा याच्यासोबत २००१ मध्ये परिचय झाला. त्या वेळी मिश्राचा आश्रम पंचकुला येथे होता. त्याचे नाव गुरुदेव साधना धाम ट्रस्ट असे होते. पुढे तरुणीचे कुटुंबीय भोंदूच्या जाळ्यात अडकले. महाराज हे दिव्यपुरुष आहेत. साक्षात परमेश्वराचा अवतार. ते सहज कोणाला भेटत नाहीत. त्यांना वाटले, तरच ते दर्शन देतात, असा समज तरुणीच्या कुटुंबीयांना करून देण्यात आला.
तरुणीचे कुटुंबीय अक्षरशः मिश्रापुढे वेडे झाले. मिश्रा सांगतील तीच पूर्व दिशा असे त्यांचे झाले. मिश्राने त्यांना आपल्या जाळ्यात खेचल्यानंतर एक मॉडर्न गुरुकुल कुरुक्षेत्र सुरू करण्याची योजना सांगितली. त्याला तरुणीच्या वडिलांनी होकार दिला. त्याचा सर्व सुरुवातीचा खर्च त्यांनीच केला. तेथे मुले-मुली बाबासोबत राहू लागले. त्याच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मुलांचे आई-वडील महिनोमहिने मुक्काम करू लागले. काही दिवसांत तरुणीच्या वडिलांनी त्याच परिसरात जागा घेऊन एक घर बांधले. त्यातील अर्ध्या जागेत मिश्राचा आश्रम, तर बाजूला ते राहत होते. एके दिवशी तरुणीचा भाऊ इमारतीवरून खाली पडला. उपचारानंतर तो घरी आला. त्या वेळी मिश्राने आवई उठवली की, हा आपल्यामुळेच बरा झाला. मी त्याला जीवदान दिले. त्यामुळे श्रद्धेच्या बाजारात त्याने भावनिकतेची विक्री केली. तरुणी देखील मिश्राच्या आश्रमात राहत होती. दरम्यानच्या काळात त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. तिची परीक्षा पाहण्याच्या नावाने मारहाण केली. तिचे कुटुंबीय मिश्राच्या इतके आहारी गेले होते, की तिने अनेकादा सांगून देखील काही फरक पडला नाही. कारण, मिश्रा अगोदरच तिला खोटे ठरवत असे. तुमची मुलगी वाईट आहे. तिला सुधरावे लागेल, असे सांगत असे. २०२० मध्ये तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना मिश्राने पुण्यात स्थलांतरित होण्यास भाग पाडले. २०१३ ते २०१६ दरम्यानच्या काळात मिश्राने तरुणीचा भयंकर छळ केला. तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिचे अश्लील व्हिडीओ काढले. विजेचे शॉक दिले. याप्रकरणी मिश्रासह आठ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीने अशा प्रकारे इतर महिलांचे शोषण केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने फिर्यादीचा अश्लील व्हिडीओ चित्रित केला आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील विजय कदम यांनी करताना आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली.
कोर्टात भक्ताकडून मिश्राला हवा घालण्याचा कार्यक्रम
मिश्राला अटक करून जेव्हा त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्याचवेळी त्याचे भक्तही या ठिकाणी जमा झाले होते. कोर्टात आणलेला मिश्रा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाबाहेरील बेंचवर झोपल्याचे आढळून आले. याचवेळी त्यातील एका भक्ताकडून मिश्राला टॉवेलने हवा घालण्याचे काम सुरू असल्याचेही निदर्शनास आले.
खोलीत महाराज, बाहेर अंकलजी
मी दैवी पुरुष आहे. तुम्ही माणसात माझ्या पाया पडू नका, मला महाराज म्हणू नका. मला 'अंकलजी' नावाने बोलवा. खोलीत मात्र माझ्या पाया पडा, माझे चरण अमृत प्या, असे तो आपल्या भक्तांना सांगत असे.
खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून काढला पळ
तरुणीला भोंदू मिश्राने आपल्या दबावाखाली ठेवले होते. ती राहत असलेल्या खोलीत त्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. तो त्या कॅमेऱ्याद्वारे तिच्यावर नियंत्रण ठेवत असे. अखेर एके दिवशी तरुणीचा संयम तुटला आणि तिने खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून पळ काढला.
खोलीभर गोळ्या सापडल्या
भोंदूबाबाचे आश्रम इतके मोठे आहे, की त्याच्या आश्रमात मोठ्या प्रमाणात गोळ्यांचा (मेडिसीन) साठा सापडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बचाव पक्षाचा बेकायदेशीर अटक केल्याचा दावा
याप्रकरणी भोंदूबाबा मिश्रासह आठ जणांना याप्रकरणी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर बचाव पक्षाचे वकील सुधीर शहा, ॲड. विजय ठोंबरे, ॲड. निवृत्ती कराड यांनी युक्तिवाद करताना आरोपींना करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले. रात्री उशिरा न्यायालयाकडून जरी परवानगी घेतली असली, तरी त्यापूर्वीच आरोपीसह महिलांना पोलिस ठाण्यात आणल्याचा दावा वकिलांनी न्यायालयात केला. तसेच, ही महिला अत्याचार झाल्यानंतर १६ वर्षे गप्प का बसली? मुख्य आरोपी मिश्रा व तरुणीच्या वडिलांचे व भावाचे मालमत्तेचे दिवाणी कोर्टात वाद सुरू असल्याचे वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आण्याचा प्रयत्न केला.
घटस्फोट घेण्यास भाग पाडले
तरुणीला लग्न करून मिश्रापासून सुटका करून घ्यायची होती; परंतु त्याने तरुणीच्या घरच्यांना अगोदरच खोटे सांगितले होते. तरुणीने विवाहविषयक संकेतस्थळावरून त्यानेच लग्न ठरविले. मात्र, अनेक जाचक अटी तिच्यासमोर ठेवल्या. पळून जाऊन तिला लग्न करण्यास सांगितले. त्यामुळे आणखी तिच्या घरचे तिच्यावर चिडले. मिश्रा तरुणी आणि तिच्या नवऱ्याचे खासगी क्षणाचे व्हिडीओ आपल्याकडे मागवून घेत असे. एकप्रकारे तो तरुणीला ब्लॅकमेल करून आपल्या ताब्यात ठेवत होता. शेवटी त्याने तिला नवऱ्यापासून विभक्त होण्यास भाग पाडले.
पीडित तरुणीने तक्रार देताच आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल करून तत्काळ आरोपीला अटक केली आहे. यामध्ये काही महिला आरोपी देखील आहेत. आश्रमातून आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मिळून आल्या आहेत. त्याची चौकशी सध्या सुरू आहे.
तेजस्वी सातपुते, अपर पोलिस आयुक्त गुन्हे