

सुरेश वाणी
नारायणगाव: जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील नागरिकांसाठी वरदान ठरण्याची अपेक्षा असलेला हिरडा कारखाना सुरू झाला नाही. याची वारंवार घोषणा होऊनही तो अद्याप अस्तित्वात येत नसल्याने स्थानिकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हिरडा कारखान्याला मुहूर्त कधी लागणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हिरडा हे जंगलातील महत्त्वाचे वन उत्पादन मानले जाते. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर हिरड्याचे उत्पादन होते. यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच हिरड्याला योग्य बाजारभाव मिळावा, या उद्देशाने हिरडा कारखान्याची संकल्पना पुढे आली होती.
मात्र, अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही हा प्रकल्प कागदोपत्रीच आहे. या कारखान्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचा दावा केला. कारखान्याचे संस्थापक आणि काही सहकाऱ्यांनीही हा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून विविध स्तरांवर पाठपुरावा केला.
काही जणांनी राजकीय समीकरणांनुसार पक्षांतर करूनही कारखान्याला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, आजही कारखाना प्रत्यक्षात सुरू झालेला नसल्याने या सर्व प्रयत्नांचे नेमके काय झाले? असा प्रश्न आदिवासी भागातील शेतकरी, वन उत्पादन संकलक आणि युवक उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, माजी आमदार अतुल बेनके यांनी या प्रकल्पासाठी सुमारे ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली होती. मात्र, हा निधी प्रत्यक्षात उपलब्ध का झाला नाही? निधी वितरणाची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर अडकली? आणि कारखाना सुरू होण्यासाठी अजून किती कालावधी लागणार? याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे हिरडा कारखान्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे.