

पुणे: शहरातील वाढते वायुप्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिकेकडून हरित इंधनाचा वापर प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत बेकरी असोसिएशनची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवून प्रदूषण नियंत्रणासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करण्यावर चर्चा झाली. (Latest Pune News)
ही बैठक महापालिकेचे उपआयुक्त (पर्यावरण) रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. शहरी भागांमधील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हद्दीतील बेकरी, हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांमध्ये हरित इंधनाचा वापर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
बैठकीदरम्यान बेकरी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी माहिती दिली की, पुणे शहरात सुमारे ७५० बेकऱ्या कार्यरत असून उपनगरांमध्ये आणखी २०० ते २५० बेकऱ्या आहेत. यापैकी बहुतेकांनी आधीच एलपीजी, पीएनजी, वीज किंवा हरित उर्जेचे पर्याय स्वीकारले आहेत. तथापि, काही बेकऱ्या अजूनही या रुपांतरणाच्या प्रक्रियेत आहेत.
बेकरी असोसिएशनने स्वच्छ इंधनाकडे वळताना येणाऱ्या तांत्रिक आणि आर्थिक अडचणींचा उल्लेख करत, महापालिकेकडून आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी केली. हवा (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ३१ (अ) नुसार, एमपीसीबीने बेकरी, हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल आणि ढाब्यांमध्ये लाकूड, कोळसा आणि तंदूरचा वापर टाळून एलपीजी, पीएनजी, वीज किंवा हरित ऊर्जा वापरण्याचे मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
बैठकीत महापालिकेच्या पर्यावरण विभागाने स्पष्ट केले की, ज्यांनी अद्याप हरित इंधनाचा वापर सुरू केलेला नाही, त्यांनी तातडीने रुपांतरण करावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.