

हडपसर: येथील मीरा भट्टड या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीने केवळ एक मिनिट सात सेकंद इतक्या कमी वेळात अठरा राज्यांसह त्यांच्या राजधान्या सांगून सर्वांना अचंबित केले. तीची ही हुशारी व कौशल्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून तीचा सन्मानपत्र व पदक देवून गौरव करण्यात आला आहे. मीराची ही अचाट बुध्दीमत्ता व आकलनक्षमतेचे तसेच, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल परिसरातून कौतुक केले जात आहे. (Latest Pune News)
येथील भोसले नगर परिसरात भट्टड कुटुंब राहत आहे. तीची आकलन क्षमता चांगली असल्याचे तीच्या हालचालीवरून लक्षात येत होते. वयाच्या अवघ्या १४ महिन्याची असताना ती आपले संपूर्ण नाव, पत्ता, वडिलांचा, आईचा व आजोबाचा मोबाईल नंबर तोंडपाठ सांगू लागली होती. तीची ही क्षमता लक्षात घेऊन आई ऐश्वर्या भट्टड-राठी हिने मीराकडून दररोज तीनचार राज्ये व त्यांच्या राजधानीची नावे वदवून घेत असे. मीरा कडूनही दररोज त्याची हसतखेळत उजळणी होत आहे. घरातील इतर मंडळी सुद्धा हे बघून तीचे कौतुक करीत आहेत. तेही हसत खेळत तिच्याबरोबर रोज खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारत असतात.
मीराची आई ऐश्वर्या म्हणाल्या, "मीराच्या हालचालिंचा वेग, तीची दृष्टी, बुद्धीचा तल्लखपणा, आकलनक्षमता तीच्या कृतीतून सात-महिन्याची असतानाच जाणवायला लागला. एक वर्षाची झाल्यावर तीची अनुकरणशीलता लक्षात आली. चौदाव्या महिन्यांपासून तीला सहजच विविध शब्द मी सांगू लागले. नंतर देशातील राज्ये व त्यांच्या राजधानी शिकवल्या. तीने त्या लक्षात ठेवल्या. तीच्या स्मरणशक्तीची कल्पना आल्यावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला संपर्क केला. त्यामध्ये ती यशस्वी झाली. आमच्या सर्व कुटुंबाला तीचा अभिमान वाटत आहे.''