

पुणे: कौटुंबिक त्रासातून एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नितीन अशोक साळवे (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. (Latest Pune News)
याबाबत नितीन यांची बहीण पूनम उमेश कांबळे (वय ४०, रा. कोकिळा बिल्डिंग, बालाजीनगर) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साळवे यांची पत्नी आरती नितीन साळवे (वय ३८) व त्यांच्या १८ व २० वर्षांच्या मुलींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर पर्वती येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन अशोक साळवे हे मुंबईतील म्हाडा येथील कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते. पत्नी व दोन मुलींबरोबर ते लक्ष्मीनगर येथे रहात होते. त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत होती. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वातीन वाजता नितीन साळवे याने आत्महत्या करण्यापूर्वी आपली बहीण पूनम कांबळे हिला व्हिडिओ कॉल केला.
पत्नी आणि मुलींच्या नेहमीच्या भांडणाला वैतागून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांच्यावर अत्यंसंस्कार केल्यानंतर आता पूनम कांबळे यांनी फिर्याद दिली असून पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करीत आहेत.