

Pune Municipal Corporation Election
पुणे : "शरीफ है हम, किससे लड़ते नहीं, जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं," अशा शब्दांमध्ये विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावत पुणे महानगरपालिका निवडणुकीत माझा फोकस फक्त विकासावर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ४) पुण्यातील जाहीर सभेत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पुण्यातील भविष्यातील विकास आराखडा सादर केला. या निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पुणे हे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन आहे. पुण्याची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याच वेगाने शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी ४४ हजार कोटी रुपयांचा सर्वसमावेशक आराखडा तयार आहे."
पुण्यातील जुन्या नियोजनावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, पूर्वी केवळ ९ टक्के रस्ते निर्माण झाले, ज्यामुळे आज ३२ रस्त्यांवर शहराची ८० टक्के वाहतूक अवलंबून आहे. आता ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियोजनाचे काम केले जाईल.
फडणवीस म्हणाले की, पुणे मेट्रोबाबत अनेक वर्षे केवळ चर्चा सुरू होती. मात्र, २०१५ आणि २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला गती मिळाली. सध्या ३३ किलोमीटरचे नेटवर्क पूर्ण झाले असून, एकूण ११० किलोमीटरच्या मेट्रोचे नियोजन आहे.
शहरात दरवर्षी ३ ते ४ लाख वाहने वाढत आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी मेट्रोसोबतच ४ हजार इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर उतरवल्या जातील. उत्तर आणि दक्षिण पुण्यातील अरुंद रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी ५४ किलोमीटरच्या भुयारी मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३२ हजार कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पुणे हे जगातील सर्वोत्तम शहर बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. पुणेकरांना शुद्ध पाणी देण्यासोबतच 'पाणी गळती' रोखण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. रस्ते, उड्डाणपूल आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी ४४ हजार कोटींचे प्रकल्प राबवले जात आहेत. पुण्याचा विकास हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर पुणेकरांचे जीवनमान सुसह्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा विकास आराखडा तयार असून येणाऱ्या काळात पुण्याचा चेहरामोहरा बदललेला दिसेल," असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.