

टाकळी हाजी: पुणे-अहिल्यानगर महामार्गावर बाह्य जिल्ह्यांच्या पासिंगची वाहने पाहून त्यातील प्रवाशांना त्रास देणे, दमदाटी करून पैसे उकळण्याच्या प्रकारांत लक्षणीय वाढ झाली आहे. सायंकाळी व रात्रीच्या वेळी अशा घटनांचे प्रमाण अधिक आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कायम गर्दी आणि वाहतूक कोंडी असते. या स्थितीचा काही समाजकंटक गैरफायदा घेत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी बाहेरील पासिंगच्या वाहनांना मुद्दाम वाहन आडवे मारून वाद घालणे, प्रवाशांना मारहाण करणे, खोट्या गुन्ह्यांची भीती दाखवली जाते. तसेच आम्ही पोलिस आहोत, अशी धमकी देणे किंवा महिलांना पुढे करून दबाव आणून पैसे उकळले जातात.
शनिवार-रविवारच्या सुटीत पुण्यातून गावाकडे जाणारे नोकरी करणारे नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. तसेच अष्टविनायक दर्शन, रांजणगाव गणपती, शंभूराजे समाधी (वढू), मोराची चिंचोली, कुंड पर्यटन (टाकळी हाजी), मळगंगा देवी, येमाई देवी (कवठे) व मेसाई देवी (कान्हूर) येथे जाणाऱ्या पर्यटकांचीही गर्दी या मार्गावर असते. मात्र परतीच्या प्रवासात सुरक्षिततेची हमी नसल्याबाबत पर्यटक चिंता व्यक्त करत आहेत.
रांजणगाव गणपती, शिक्रापूर, सणसवाडी आणि कोरेगाव भीमा परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या परिसरातच प्रवाशांची लूटमार प्रकार वाढले आहेत.
या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांची गस्त वाढवावी, रात्री नियमित पेट्रोलिंग सुरू करावे. तसेच पोलिस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचेही नागरिकांचे म्हणने आहे.