

पिंपरखेड: जुन्नर व परिसरातील बिबटप्रवण क्षेत्रात मानवी हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आता या क्षेत्रातील सर्व शाळा सकाळी ९.३० ते दुपारी ४ या वेळेतच चालणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत हा आदेश जारी केला आहे.
बिबटप्रवण क्षेत्रातील प्रत्येक शाळेने नवीन वेळ लागू करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती / शाळा समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांची प्रकरणे समोर आली आहेत. बहुतांश विद्यार्थी पायी शाळेत ये-जा करतात आणि त्यांच्या मार्गावर ऊस शेती, जंगल भाग, डोंगराळ परिसर असल्याने धोका वाढतो. ऊसतोडीमुळे परिसरातील उसाचा व्याप कमी झाला असून बिबट मानववस्तीच्या दिशेने अधिक जवळ येत असल्याचेही प्रशासनाने निदर्शनास आणले आहे. हिवाळ्यात लवकर अंधार पडत असल्याने संध्याकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचणे कठीण होत आहे.
यासाठी बिबटप्रवण आपत्ती क्षेत्रातील शाळांच्या वेळेत सकाळी ९.३० ते दुपारी ४ असा बदल शाळा व्यवस्थापन समिती / शाळा समितीची मंजुरी घेऊन करण्यास परवानगी देण्यात येत आहे. सर्व बिबटप्रवण आपत्ती क्षेत्रातील शाळांच्या तसेच याव्यतिरिक्त बिबट्यांचा वावर असणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच पुणे जिल्ह्यातील सर्वच शाळास्तरावर सकाळच्या परिपाठात सुरक्षिततेबाबत सर्व विद्यार्थ्याचे तत्काळ उद्बोधन करण्यात यावे.
शाळास्तरावर पालक मेळावे घेत शाळेत येताना व शाळा सुटताना पाल्यांना स्वतः घेऊन जाणेबाबत पालकांना अवगत करावे. प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची वर्गशिक्षकांनी खात्री करणे आवश्यक आहे. तसेच शालेय स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या सभा दरमहा घेऊन विद्यार्थी सुरक्षेच्या अधिकच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश बिबटप्रवण क्षेत्रातील गटशिक्षणाधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिले आहेत.