

नारायणगाव: ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पाऊस पडल्यास कांदा तसेच सोयाबीन व भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सध्या जुन्नर तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. तापमानदेखील वाढले आहे. दिवसभर उकाडा असतो तर रात्री अकरानंतर थंडीचे प्रमाण वाढते. हवामान खात्याने 26 तारखेपासून पाऊस होण्याची शक्यता असल्याचे सांगितल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. जुलै - ऑगस्टमध्ये लागवड केलेला पावसाळी कांदा काही ठिकाणी काढणीला आला आहे. महिन्यापूर्वी झालेल्या पावसामुळे कांदा काही प्रमाणात खराब झाला होता. कांद्यावर करप्याचा प्रादुर्भाव वाढला होता. औषध फवारणी करून करपा शेतकऱ्यांनी आटोक्यात आणला.
गेली दोन दिवसांपासून आकाशात मोठ्या प्रमाणात ढग येऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळी कांद्याचीदेखील लागवड सुरू आहे. अचानक पाऊस आला तर कांद्याची रोपे खराब होण्याची शक्यता आहे.
सध्या उंब्रज, बनकरफाटा, रोहकडी, डिगोरे, उदयपूर, कुमशेत, तेजेवाडी या भागामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महिन्यापूर्वी पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे रोप सडून गेले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना रोपाला अधिकचे पैसे मोजण्याची पाळी आली आहे. अनेक ठिकाणी रोप पिवळे पडले आहे. दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी या रोपाचे शेंडे कट करून कांद्याची लागवड करीत आहेत.
आदिवासी भागामध्ये सध्या भात कापणीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी सोयाबीनदेखील तयार केले जात आहे. अचानक पाऊस आला तर याचा फटका या दोन्ही पिकांना बसण्याची शक्यता आहे.