पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आगामी काळात 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे नियोजन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने केलेले आहे.
एकूण 13 हजार 371 कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या असून, याद्या प्राप्त न झालेल्या संस्थांवर कारवाईचे आदेश आहेत. औरंगाबाद खंडपीठाने 18 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणुकीस पात्र कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका मुदतीत पूर्ण कराव्यात व त्यानंतरच बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पहिल्या, दुसर्या व तिसर्या टप्प्यातील अनुक्रमे 652, 1 हजार 611 व 15 हजार 320 अशा 17 हजार 583 कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्यापैकी अनुक्रमे 652, 972 व 11 हजार 747 अशा 13 हजार 371 कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
याद्या प्राप्त झालेल्या आहेत, अशा उर्वरित कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यांना सूचना आहेत. तसेच, याद्या प्राप्त न झालेल्या संस्थांवर कारवाईचे आदेश देण्यात आहेत. कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पूर्ण करण्यात येणार आहेतच असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी कळविले आहे.
राज्यात 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असून, 21 मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने पूर्ण केलेल्या आहेत. शासनाने आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन नाशिक, सोलापूर, नागपूर आणि बुलढाणा या 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर पुढे ढकलल्या आहेत. रायगड व जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 2022 या वर्षात निवडणुकीस पात्र असून, प्राधिकरणाने या बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू केलेली नाही.