SERGIY STAKHOVSKY : विम्बल्डन विजेता सर्गेईची युक्रेनच्या रस्त्यावर गस्त | पुढारी

SERGIY STAKHOVSKY : विम्बल्डन विजेता सर्गेईची युक्रेनच्या रस्त्यावर गस्त

कीव्ह; वृत्तसंस्था : अभिनेत्यांपासून खेळाडूंपर्यंत सर्वच जण आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी रणभूमीवर उतरले आहेत. त्यातच टेनिसस्टार सर्गेई स्टाखोव्हस्की (SERGIY STAKHOVSKY) हा सुद्धा युक्रेनच्या रस्त्यावरून हातात बंदूक घेऊन गस्त घालत आहे. विशेष म्हणजे सर्गेई याने 2013 मध्ये विम्बलंडनमध्ये दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला पराभूत केले होते. मात्र, आता आपल्या देशावर संकट आले असताना त्याने आपले करिअरच थांबवले आहे. सर्गेई सैनिकी पोशाखात हातात बंदूक घेऊन शत्रूशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.

आयुष्याच्या आपल्या दुसर्‍या इनिंगबाबत बोलताना सर्गेई (SERGIY STAKHOVSKY) म्हणाला की, आम्ही तीन ते पाच जणांचे गट केले आहे. प्रत्येकाला दोन शिफ्टमध्ये काम करावे लागते, त्यानंतर सहा तास झोप घेतो. रशियाबरोबरच्या युद्धात जर युक्रेनचा पराभव झाल्यास इतिहासाच्या पानांतून युक्रेनचे नाव नामशेष होईल. त्यामुळे रशियाचे एजंट आणि घुसखोरांना कोणत्याही परिस्थितीत आम्हाला रोखावयाचे आहे. मी माझ्या देशाच्या रक्षणासाठी तयार आहे. माझ्याकडे सैनिकी अनुभव नाही, मात्र मला बंदूक चालविता येते. माझे वडील आणि भाऊ डॉक्टर आहेत. त्यांना मी कधीच तणावाखाली बघू शकत नसल्याचे सर्गेई याने नमूद केले.

जानेवारीत सर्गेईने घेतली होती निवृत्ती (SERGIY STAKHOVSKY)

36 वर्षीय सर्गेईने जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेनंतर निवृत्ती घेतली आहे, मात्र तो सध्या स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत आहे. सर्गेई याच्याशिवाय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता बॉक्सर वासिली लोमाचेंको आणि टेनिसपटू अ‍ॅलेक्झांडर डोलगोपोलोव्ह हे सुद्धा देश रक्षणासाठी रणभूमीवर उतरले आहेत.

Back to top button