

सुनील माळी
स्थळ: हडपसर गावातलं 'गीता भवन' हे छान चहा मिळण्याचं आणि त्याचा आस्वाद घेताघेता खमंग राजकीय चर्चा करण्याचं ठिकाण...
वेळ: थंडीच्या मोसमातली सकाळी नऊचं कोवळं उनं अंगावर घेण्याची...
तुपे, लोणकर, बनकर आणि जगताप हे चार कार्यकर्ते बाहेरून येतात आणि उन अंगावर येईल, अशा बेतानं बसतात.
तुपे: काय रे ?... आमच्या दादांची आणि तुमच्या सायबांची चांगली एकी होतीयं या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये... तर तुमच्या वानवडीचं प्रशांतराव का त्याला आडवं चालल्यात ?...
जगताप: हो ना किशोर... तू म्हणतो ते खरंय... शेवटी पवार साहेब अन दादा एकाच घरातले, दोघांचा आतापरयंतचा प्रवास एकत्रच चालला होता... साहेब काँग्रेसमध्ये तर दादा काँग्रेसमध्ये, साहेबांनी काँग्रेस सोडली अन राष्ट्रवादी पार्टी काढली तर दादा त्यांच्याबरोबर..., पण मध्येच बीजेपीनं त्यांना फोडलं अन चांगल्या घराचे दोन तुकडे केलेतं... आता अशा वेळी परत दोघं एकत्र येत असतील तर त्याला नाट का लावताएत प्रशांतराव ?... का वो लोनकर ?...
लोणकर: अगदी बरुबर हाये तुमचा पाईंटाचा मुद्दा... अवो... आतापातोर अजित दादा काय ? अन सरद पवार सायेब काय ? दोगं एकाच पक्सात हुते ना ? दोगांच्याच फुडारीपनाखाली परसांतरावांनी काम केलंय ना ? अवं, निसतं काम नाय केलं तर म्हापौरपदबी या दोगांच्याच मारगदरसनाखाली मिळवलं ना परसांतरावांनी ?... अनेक निवडनुका अजितदादा अन पवारसायेब यांच्या बरूबर लडल्या, सोता सबागृहात आले, आपल्या मातोश्रींना निवडून आनलं... मग आता दोगं एकत्र आली तर हे चालले पक्स सोडून कांगरेसमदे ?... हे गनित आपल्याला उमगत नाय बा...
तुपे: ए बनकरा..., तू का गप्प ? अन गालातल्या गालात हसतोएस का ?... तू काहीपण बोलत नाहीस... का रे ?...
बनकर: अरे खुळ्यांनो, तुमचं बोलणं ऐकून असं वाटतं की तुम्हाला राजकारण काहीच कळत नाही...
तुपे: आमच्या काळ्याचे पांढरे झाले नेत्यांच्या मागं धावून अन प्रचारफेऱ्या काढून... तरीही म्हणतोस आम्हाला राजकारण कळत नाही ?
बनकर: फक्त काळ्याचे पांढरे होईपर्यंत पक्षात काम केलं म्हणजे राजकारण कळलं असं होईल का कधी ?... प्रचारफेऱ्या काढल्या अन घोषणा दिल्या की झाला कार्यकर्ता शहाणा असं होतं का ?...
लोणकर: तुला समजतं ना राजकारण ? आम्हाला तिघांनाही कळत नाही प्रशांतरावांनी असा पक्ष का सोडला काहीही कारण नसताना ? तुला काय वाटतं ते सांग ना ?
बनकर: ऐका मग मला वाटत असलेली कारणं... बघा पटतात का ? हे बघा..., प्रशांतराव वानवडी भागातून महापालिकेत निवडून जातात..., पण आता त्यांना फक्त नगरसेवकपदाचीच इच्छा नाही उरलेली. आता त्यांना विधानसभा खुणावतेय..., त्यांना आमदार व्हायचंय..., विधानसभेची गेली निवडणूक त्यांनी लढवलीही त्याच महत्त्वाकांक्षेतून... आणि महत्त्वाकांक्षा प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला हवीच ना ?... त्यांचा पराभव झाला ती गोष्ट वेगळी, पण कधी ना कधी हडपसरमधून आमदारकी मिळवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आता आमदारकी मिळवायला काय लागतं ? तर विधानसभेची निवडणूक लढवावी लागते. ती निवडणूक जिंकण्यासाठी काय लागतं ? प्रत्येक भागातल्या बहुसंख्य मतदारांचा पाठिंबा लागतो... प्रत्येक भागातून बहुसंख्य मतदारांनी पाठिंबा देण्यासाठी काय लागतं ?... तर त्या प्रत्येक भागात आपल्याला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी लागते.... ही फळी एखाद्या राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्याला कधी मानू लागते ?... जेव्हा त्या फळीतल्या कार्यकर्त्यांना महापालिकेची उमेदवारी तो प्रमुख कार्यकर्ता देतो आणि निवडूनही आणतो तेव्हा... मग खुळ्यांनो, आता प्रशांतरावांना फक्त महापालिकेचं सभासदत्व नकोय..., तिकीट वाटपाचा अधिकार हवाय...
तुपे: अरे बापरे..., खरंच की रे बनकरा... माझ्या लक्षातच आलं नाही हे... तिकीटं निश्चित करायचा अधिकार असतो आमदाराकडं... अन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले की तो अधिकार जाणार आताचे आमदार चेतनदादा तुपेंकडं... मग, प्रशांतराव आपल्या कार्यकर्त्यांची तिकीटं कशी बसवणार अन पुढची विधानसभा कशी जिंकणार ?...
बनकर: शाबास रे पठ्ठ्या माझा... आता तुला कळायला लागलंय... अरे, प्रशांतरावांनी निवडणूकच मुळी लढवली चेतनदादांविरोधात..., मग त्याच्या हाताखाली पालिकेच्या इलेक्शनमध्ये कसं प्रशांतराव काम करणार ?... त्यांनी परवापरतापर्यंत फील्डिंग व्यवस्थित लावली होती... पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीच्या यंत्रणेची घडी बसवत आणली होती... पुऱ्या शहराच्याच इलेक्शनचं नियोजन त्यांनी केलं होतं..., अर्थात, त्यातही मुख्यत: हडपसरचं नियोजन त्यांनी केलं होतंच..., पण कसंच काय अन कसंच काय ?... दोन्ही राष्ट्रवादी एक होणार आता... मग कसं होणार प्रशांतरावांचं आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण ?...
तुपे: बरोबर रे बनकरा..., तुझं ऐकल्यावर आजून एक मुद्दा मला लक्षात येतोय..., काँग्रेसही आता हडपसरमध्ये नव्या पिढीच्या चेहऱ्याच्या शोधात होतीच ना ?... बाळासाहेब शिवरकरांना साथ द्यायला आता नव्या पिढीचं नेतृत्व हडपसरमध्ये द्यायचा त्यांचा प्रयत्न असेल ना ?... म्हणूनच तर प्रशांतराव काँग्रेसमध्ये गेले... अजितदादांचं नेतृत्व पटलं नाही, असा त्याचा अर्थ नाही... कारण ते जाताना दादा, पवारसाहेब आणि सुप्रियाताई यांच्या नेतृत्वाबाबत तोंड भरून बोलले ना...
बनकर: बरोब्बर..., अरे आताच्या काळात सगळे चाललेत बीजेपीत, काही जण शिंदे सेनेत, पण काँग्रेसमध्ये कोण गेलंय असं ऐकलं का तुम्ही ?... पण प्रशांतराव गेले त्याला कारण काँग्रेसला येत्या निवडणुकीत खूप आशा आहेत, म्हणून नव्हे तर आपल्या स्वत:च्या नेतृत्वाची पायाभरणी होण्यासाठी...
चला, चहा झाला. आता आपल्याला पार्टी ऑफिसमध्ये जायचंय ना ?...